

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, मतदान हा तुमचा अधिकार आहे, असे स्पष्ट करीत ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले. मतदानाबाबत संभ्रम नको, समाजाने बरोबर कार्यक्रम लावला आहे, असे ते म्हणाले.
अंतरवाली सराटी येथे रविवारी (दि.१०) सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणुकीबाबत भूमिका विशद केली. मतदानाबाबत यापूर्वीही आपण सांगितले आहे. लोकांमध्ये संभ्रम असण्याची गरज नाही. जे स्वार्थासाठी दुसऱ्याच्या नरड्याचा घोट घ्यायला निघाले, ते संभ्रम असण्याबाबतची चर्चा करत आहेत. स्पष्ट सांगण्याचीही गरज नाही, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमत असणाऱ्या उमेदवारांचा व्हिडिओ घ्या, पुरावा म्हणून कामास येईल. वाटल्यास लिहूनही घ्या, त्यानंतर समाजाने कुणाच्या पाठीशी उभे राहायचे हे ठरवावे.
मराठ्यांनी मतदान वाया घालू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात आपण कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. आर- क्षणासाठी कोण धावून येतोय ते पाहून समाजाने कोणाला मतदान करावयाचे हे निश्चत करावे. कोणताही पक्ष सत्तेत आला तरी आंदोलन करावे लागणार आहे. आमचा जीव आरक्षण आंदोलनात आरक्षणात गुंतलेला आहे. कोणाच्याही सभेला व प्रचाराला जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना सुट्टी नाही. विरोध करणारे कोण हे समाजाला सांगण्याची गरज नाही. मराठा तेवढा हुशार आहे, असे सांगून मराठा समाजाने एकजुटीने मतदान करावे, असे जरांगे म्हणाले. आपल्या आंदोलनाला कोणीही काहीही करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनाही घाबरण्याची गरज नाही. ४०-५० वर्षांत झाले नाही तेवढे नुकसान फडणवीस यांनी पाच वर्षांत केले, असा आरोप त्यांनी केला.
पुन्हा आंदोलनाची तयारी राजकारणाच्या तयारीपेक्षा आपण आता आंदोलनाची तयारी सुरू करू. कोणीही आले तरी आपल्याला आंदोलन करावेच लागणार आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचे नाही. आरक्षणासाठी पुन्हा मोट बांधू, असे सांगतानाच निवडणूक काळात आरक्षण लढ्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.