
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला. त्यांना आता सोडायचे नाही. आपल्या मागणीशी संबंधित असणाऱ्यांचे व्हिडिओ करून घ्या, जो आपल्या मागण्यांशी सहमत राहील, त्या उमेदवाराला निवडून आणा, पण तो व्हिडिओ व्हायरल करू नका, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी आज (दि.१०) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
जरांगे पुढे म्हणाले की, गाव पातळीवर याबाबत निर्णय घ्यावा, व्हिडिओ पण बनवा आणि लिहून पण घ्या. गावागावात व्हिडीओ बनवा, पण ते व्हायरल करू नका. आता मला विचारायचे काम नाही. मी काही पक्ष सांगितला नाही. तुम्हाला कोण पाहिजे, कोण मदतीला येतो, तुमच्या आरक्षणाबद्दल कोण बोलतो ते बघा, आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष असा कुणालाही पाठिंबा दिलेला नाही.
राजकारणाच्या तयारी पेक्षा आपण आता आंदोलनाची तयारी सुरू करू, कोणीही आले तरी आपल्याला आंदोलन करावेच लागणार आहे. मराठ्यांनी एकजुटीने मतदान करा. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. आपल्याला आरक्षण पाहिजे, आपण राजकारण करायचे नाही. पण आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचं नाही. आपण आरक्षणासाठी पुन्हा मोट बांधू. मराठ्यांनी एकजूट फुटू देऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.