.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी (दि. २६) जाहीर केली. येवल्यामधून माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. नाशिक पूर्वमधून गणेश गिते, बागलाणमधून दीपिका चव्हाण, सिन्नरला उदय सांगळे व दिंडाेरीत सुनीता चारोस्कर यांना तिकीट देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असताना, आघाडीतील नावांचा सस्पेन्स कायम होता. अखेर शरद पवार गटाने त्यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. यात जिल्ह्यातील पाच नावांचा समावेश आहे. शरद पवार पक्षाने जाहीर केलेले उमेदवार बघता, येवला, दिंडाेरी व सिन्नर येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे, तर उर्वरित दोन्ही मतदारसंघांतून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.
ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या येवल्यामधून शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात चारोस्कर या लढतील. तेथेही राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी लढत होणार असल्याने ती लक्षवेधी ठरेल.
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे बंडखोर गणेश गिते यांच्या गळ्यात पवार गटाने उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पूर्वाश्रमीच्या पक्षातील दोन मित्रांमध्ये लढत होईल. सिन्नरला राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटेंच्या विरोधात उदय सांगळे हे उमेदवार असतील. तसेच बागलाणमध्ये दिलीप बाेरसे यांच्याविरोधात माजी आमदार दीपिका चव्हाण यांनाच तिकीट दिल्याने मतदारसंघात पारंपरिक लढत अटळ आहे.
शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषित करण्यात आले. मात्र देवळाली व कळवण हे दोन्ही हक्काचे मतदारसंघ पक्षाने ठाकरे गट तसेच माकपला सोडले. देवळालीसाठी पक्षांतर्गत इच्छुक व कार्यकर्त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडले होते. पण, ऐन निवडणुकीत हातचे दोन्ही मतदारसंघ गेल्याने कार्यकर्त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बसून निर्णय घेतला आहे. ज्या पक्षावर व नेत्यावर निष्ठा असते त्यांंचे आदेश शेवटी अंतिम असतात. खा. शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.
कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष, शरद पवार पक्ष, नाशिक.