

मुंबई : Maharashtra Assembly Polls | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात महायुतीने पाठिंबा द्यावा, अशी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडलेली भूमिका शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी फेटाळून लावल्याने दादरच्या बालेकिल्ल्यात घमासान होण्याची चिन्हे आहेत.
माहीमची निवडणूक लढवणारच, या सरवणकरांच्या ठाम भूमिकेनंतर शिंदे गटाच्या शाखेसमोर शनिवारी रात्री सरवणकर समर्थक शिवसैनिकांची प्रचंड जमवाजमव करत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. माहीममध्ये अमित राज ठाकरे विरुद्ध शिंदे सेनेचे सदा सरवणकर विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिरंगी लढत होऊ घातली आहे. या लढतीत मनसेचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर खात्रीने कुणीही देत नसल्याने मनसेच्या मदतीला राज ठाकरेंचे मित्र व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार धावून गेले. शिंदे सेनेने माघार घ्यावी आणि महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव शेलार यांनी पत्रकार परिषदेत मांडला. राज यांची भूमिका हिंदुत्वाची आहे. शिवाय, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Polls)
शेलारांच्या प्रस्तावावर शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर दिले जाण्यापूर्वीच त्यांचे उमेदवार सदा सरवणकर यांनी शेलारांचा हा प्रस्ताव 'व्यक्तिगत' ठरवत फेटाळून लावला. सरवणकर आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, मागचे दरवाजे मला पसंत नाहीत. मागच्या दाराने खेळणारा मी नाही. माघार घेण्यासाठी माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मी ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार. शेलार जे बोलले ते त्यांचे मत आहे. राज ठाकरेंवरील प्रेमापोटी ते बोलले असावेत. आमचे नेते एकनाथ शिंदे पक्षहिताचा विचार करूनच निर्णय घेतील. मात्र माहीममध्ये शिवसेना आणखी मोठी होण्याची गरज आहे. इथल्या लोकांना सहज भेटणारा नेता, लोकप्रतिनिधी हवा असतो, असा टोलाही सरवणकर यांनी मनसे नेत्यांचे नाव न घेता लगावला. (Maharashtra Assembly Polls)