

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून (Kolhapur Uttar) अर्ज माघारीच्या शेवटच्या दहा मिनिटांत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतली अन् राजकीय भूकंप घडला. आपल्याशी कोणतीच चर्चा न करता मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार सतेज पाटील संतप्त झाले. कालच्या रूद्रावतारानंतर आज सतेज पाटील यांनी कालच्या विषयावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून पुढची दिशा संध्याकाळपर्यंत जाहीर करू, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
जे काही घडलं ते सर्वांसमोर आहे. आता पुढची दिशा ठरवणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेणार आहे. आज रात्री पर्यंत उत्तरचा निर्णय जाहीर करू. कोणावरही वैयक्तिक टीका-टीप्पणी करणार नाही. घटना घडली आहे, त्यावर बोलून पुन्हा वाद निर्माण करणार नाही. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल आदर आहे. पुढचे १५ दिवस सर्वांना सोबत घेवून जायचं आहे, असे सतेज पाटील म्हणाले. (Kolhapur Uttar)
उत्तर कोल्हापुरातून काँग्रेस गायब झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महाराष्ट्रातील जनता २० तारखेनंतर महायुतीला गायब करेल. आमच्यावर बोलण्यापेक्षा २० तारखेला ते स्वत: गायब होतील, हे जनता दाखवून देईल, असे प्रत्युत्तर सतेज पाटील यांनी फडणवीसांच्या टीकेला दिले. स्वत:च्या राजकारणासाठी छत्रपती घराण्याचा वापर केल्याची टीका महाडिक यांनी पाटील यांच्यावर केली होती. यावर बोलताना म्हणाले, महाडिकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. लोकसभेला त्यांनी उलटा प्रचार का केला? असा सवाल करत सतेज पाटील म्हणाले की, हे राजकारण आता होणार. सर्व काही मागे टाकून पुढे जाणं हे माझं ध्येय आहे.