

सिद्धनेर्ली : पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणतात, शरद पवारसाहेब यांना मी गुरुदक्षिणा दिली आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाळीस आमदारांच्या सह्या घेऊन पक्ष फोडण्याचे षड्यंत्र त्यांनी रचले. पवारसाहेबांना त्यांनी हीच गुरुदक्षिणा दिली काय, असा परखड सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. बामणी (ता. कागल) येथे महिला व युवती स्वाभिमान मेळाव्यात त्या बोलत होत्या.
खा. सुळे पुढे म्हणाल्या, छत्रपती शाहू घराण्याचा वारसा लाभलेला निष्कलंक आणि उच्चशिक्षित उमेदवार एका बाजूला, तर ईडीला घाबरून मागच्या दाराने पळून जाणारा उमेदवार दुसर्या बाजूला अशी लढत येथे होत आहे. परिवर्तन करण्याची, क्रांती घडवण्याची क्षमता महिलांमध्ये असते. चांगलं काय, वाईट काय, हे महिलांना चांगलं उमगतं.
जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज साखर कारखाना पालकमंत्री मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खासगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे. उमेदवार समरजितसिंह घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांची भाषणे झाली.
यावेळी रणजितसिंह पाटील, सागर कोंडेकर, शिवाजीराव कांबळे, संभाजीराव भोकरे, शिवानंद माळी, अश्विनी माने, अश्विनी भारांबळे, संगीता लोहार, विजया निंबाळकर, अनुराधा पाटील, अनिता सातुशे, शकिला शानेदिवाण, सानिका पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार बामणीच्या सरपंच अनुराधा पाटील यांनी मानले.
स्वाभिमानी जनता गद्दारांना माफ करणार नाही स्वाती कोरी म्हणाल्या, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा माणूस मतांसाठी पैसे देतो, हे पैसे आले कुठून? सभासदांचे गोळा केलेले पैसे स्वतःच्या खासगी कारखान्याकडे वळवले. सगळी सत्ता देणार्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हसन मुश्रीफ तुमचा-आमचा काय विचार करणार आहेत? राजर्षी शाहूंच्या भूमीतील स्वाभिमानी जनता अशा गद्दारांना कदापि माफी देणार नाही.
छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलकरांनी पवारसाहेबांना कायमच साथ दिली. त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्यामुळे त्यांनी नेहमीच कागलचा सन्मान केला; मात्र ज्यांचा सन्मान केला, ते स्वार्थासाठी सोडून गेले. समरजितराजेंना आमदार करण्याचा कागलकरांचा शब्द असल्याचा निरोप तुमच्या वतीने मी पवारसाहेबांना देत आहे, असे प्रतिपादन खा. सुळे यांनी यावेळी केले.