
नागपूर : दक्षिण नागपुरात धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई आहे. नोटांच्याच भरवशावर निवडणूक जिंकता आली असती तर या देशात टाटा आणि बिर्लाचेच सरकार आले असते. आणि तेच पंतप्रधान झाले असते. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. नागपुरातील ताजबाग येथे महायुतीचे उमेदवार आ.मोहन मते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, कोविडच्या महामारीत, अनेक लोक घरी लपले होते, घाबरले होते, बाहेर निघत नव्हते. तेव्हा मोहन भाऊंनी 100 बेडच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली. अन्नछत्र उभारले. शेकडो कोटींची विकास कामे केली. अनेक लोक जातीवर मत मागतात. लाडकी बहीण योजनेला काँग्रेस, उबाठा, पवार गटाचे लोक विरोध करत होते. मात्र अडीच कोटी बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून झाले आहेत. बहिणींनो सावत्र भाऊ फिरताहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. सावत्र भाऊ निवडून आले तर ही योजना बंद होईल याकडे लक्ष वेधले. असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार मोहन मते, महानगराध्यक्ष बंटी कुकडे, विजय असोले, विठ्ठल भेदे, देवेंद्र दस्तुरे, मनीषा पापळकर, अरविंद भाजीपाले,श्रीकांत शिवणकर, अमित कातोरे, परशु ठाकूर, रूपाली ठाकूर,कल्पना मानकर, स्नेहा बिहारे, पिंटू झलके,दिव्या धुरडे, वंदना भगत आदी अनेक माजी नगरसेवक, मंडल पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष नागरिक उपस्थित होते.