

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना उबाठा पक्षाला शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे विशेषतः पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाची मशाल मंदावल्याचे चित्र आहे. शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी पक्ष सोडून गेले आहेत. तर काहींनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांना बसण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. २००४ सालापासून या मतदारसंघात सतत शिव- सेनेचे आमदार निवडून आले आहेत. शिवसे- नेतील फुटीनंतरच्या या पहिल्या निवडणुकीत या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना होतो आहे. महायुतीकडून शिंदेंच्या सेनेचे संजय शिरसाट हे निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या सेनेने राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.
पक्षाचे शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, उप तालुकाप्रमुख कैलास भोकरे, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे तसेच संतोष बोर्डे, पवन जैस्वाल, अभिजित पगारे यासह अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या सेनेत दाखल झाले. त्यामुळे राजू शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. आणखीही काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पश्चिम मतदारसंघातील उमेदवारीवरूनही ठाकरे गटात काहीशी नाराजी आहे. या ठिकाणी पक्षाने राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राजू शिंदे यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपातून ठाकरे सेनेत प्रवेश केला होता. लगेचच त्यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षातील इतर इच्छुक नाराज आहेत. पक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड हेही इच्छुक होते. ते सध्या पक्षाच्या प्रचार मोहिमेपासून अलिप्त आहेत. याशिवाय इतरही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही पक्षाच्या प्रचारातून दूर राहणे पसंत केले आहे.