

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजमी प्रक्रिया शनिवारी (दि.२४) पार पडली. भाजप-१३२, शिंदेंची शिवसेना-५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांसह महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. एकुण २८८ आमदार संख्या असणार्या विधानसभेत यंदा २१ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राज्यातून एकूण ३६३ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. सत्ताधारी महायुतीकडून ३० महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती. (भाजप-१८, शिंदे शिवसेना-८, अजित पवार-४) यामध्ये १२ विद्यमान आमदार होत्या. महाविकास आघाडीकडून देखील ३० महिला उमेदवारांना निवडणूक तिकीट देण्यात आले होते. (शरद पवार-११, काँग्रेस-९, ठाकरेंची शिवसेना-१०) त्यांच्यामध्ये २ विद्यमान आमदार होत्या. तर अपक्ष महिला उमेदवार देखील या निवडणूकीत मैदानात होत्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी निवडणुकीच्या मैदान असलेल्या एकूण ३६३ महिला उमेदवारांपैकी २१ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. सत्ताधारी महायुतीच्या २० तर विरोधी पक्षातील केवळ १ महिला आमदार विधानसभेला निवडून आली आहे. यापैकी सर्वाधिक भाजपच्या जवळपास १४ महिला निवडून आल्या असून, त्यापैकी १० महिला उमेदवार या विद्यमान आमदार आहेत.
भाजपच्या सर्वाधिक १४ महिला उमेदवार विजयी झाल्या, ज्यात 10 फेरनिवडून आलेल्या आहेत: श्वेता महाले (चिकली मतदारसंघ), मेघना बोर्डीकर (जिंतूर), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव) आणि नमिता मुंदडा (कैज).
निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या मतदानाच्या निकालानुसार, भाजपच्या चार नवीन महिला विजयी झाल्या आहेत. यामध्ये श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) यांचा समावेश आहे.
सत्ताधारी शिवसेनेच्या तिकिटावर मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिलांनी निवडणूक जिंकली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिल्या विजयी झाल्या आहेत. विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड (धारावी) या एकमेव महिला आमदार आहेत.