सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे आणि शिवसेना (उबाठा) उपनेते शरद कोळींवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
महाविकास आघाडीतून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेने (उबाठा) च्या वतीने अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावरून ऐन निवडणुकीच्या काळात चांगलेच वातावरण तापले होते. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार दिलीप माने यांना पक्षाचा बी फार्म दिला गेला नाही. यामुळे काँग्रेसकउून आघाडी धर्म पाळल्याचे सांगण्यात आले. परंतु मतदानादिवशी अपक्ष उमदेवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला. यामुळे शिवसेना (उबाठा) पदाधिकारी चांगलेच संतापले. मतदान प्रकिया पार पडल्यानंतर रात्री 8.15 ते 8.30 च्या दरम्यान माजी आमदार उत्तप्रकाश खंदारे व उपनेते शरद कोळी यांनी पत्रकार भवनजवळील पक्षाच्या (उबाठा) कार्यालयाजवळ खा. शिंदे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. त्यावेळी महाविकास आघाडीचा धर्म न पाळल्याने शिवसैनिक संतप्त झाल्याच्या घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश असल्याने गर्दी करू नका असे आवाहन आंदोलकांना करण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करून आंदोलकांनी आंदोलन करून आदेशाचा भंग केला.