

भंडारा: संविधानात प्रत्येक धर्माचा आदर आहे. समानता आहे. परंतु, आरएसएस आणि नरेंद्र मोदी संविधानावर आक्रमण करून संविधानाची हत्या करू पाहात आहेत. ते समोरून बोलत नाहीत. जनता तुटून पडेल म्हणून ते बंद दाराआड हे कारस्थान रचत आहेत. त्यांचे कारस्थान हाणून पाडण्याची, संविधान वाचविण्याची ही लढाई आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचे वाचन केले असते, तर संविधानाचा आदर केला असता. मात्र त्यांनी संविधानाचे वाचन केलेच नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
गोंदिया येथील सर्कस ग्राउंड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. १२) राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी दीड वाजता होणारी ही सभा सायंकाळी सव्वाचारला सुरू झाली. ‘आपका मुड कैसा है’ या वाक्याने राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीलाच संविधान बदलाची भाषा वापरणाऱ्या आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन महाराष्ट्रातील सरकार पाडली. गेल्या दहा वर्षांत एकाही शेतकऱ्याचे कर्ज या सरकारने माफ केले नाही. उलट अदानी, अंबानी यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. हे सरकार शेतकरी हिताची नाही, तर करोडपतींच्या हिताची आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे उद्योग, प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलविण्याचे काम नरेंद्र मोंदींनी केले. शेतकऱ्यांबाबत तीन काळे कायदे या सरकारने केले. हे कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे आहेत, असे नरेंद्र मोदी सांगत होते. मग शेकडो शेतकरी रस्त्यावर का उतरले? असा प्रश्न उपस्थित करीत राहुल गांधी यांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असा आरोप केला. यावेळी मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. प्रशांत पडोळे, महाविकास आघाडीचे उमेदवार व नेते उपस्थित होते.