
जळगाव : महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण मला खुर्ची मिळाली पाहिजे, खुर्ची मिळवण्यासाठी काही लोक लाचार झालेले आहेत. त्याला खुर्ची दिली होती, परंतु त्याला मुख्यमंत्री व्हायचे होते असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी चाळीसगाव येथे झालेल्या सभेत लगावला.
चाळीसगाव या ठिकाणी सभेत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यांनी खुर्चीसाठी लाचारी पत्करली येथे स्वतःसाठी ते बूट चाटत आहेत. जे उद्योगधंदे राज्यात येत होते ते आता सध्या गुजरातमध्ये जात आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रावर संकट येते त्यावेळेस आपण एकत्र आले नाही तर महाराष्ट्र हे लुटून फस्त करतील. महाराष्ट्र ही आई आहे आणि आपणच आज आपसात भांडत राहिले तर हे लुटारू सर्व लुटून घेऊन जातील.
भाजपात आता सच्चे लोक उरलेले नाही इतर ठिकाणाहून आलेले सर्व भाजपात आलेले आहेत. भाजपात निष्ठावंत फक्त सतरंजी उचलण्यासाठी राहिलेले आहेत. त्यांच्या डोक्यावर भ्रष्टाचारी लोक आणून बसवलेले आहेत. मोदीजी म्हणतात ना आघाडीला इंजिन नाही, मात्र आपल्या गाडीला जी भ्रष्टाचारी चेहऱ्याची चाके लागली आहेत. ती पंक्चर करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.