

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताचा कौल मिळाला. पण गेल्या १० दिवसांपासून राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठका रद्द केल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तास्थापनेबाबतच्या चर्चेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली असल्याचे त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे साताऱ्यातील दरे गावी गेलेले एकनाथ शिंदे काल रविवारी ठाण्यात परतले. ते खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार होते. पण त्यांना घशाचा संसर्ग आणि ताप आला आहे. त्यामुळे ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे परतले नाहीत. त्यांनी आजच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत.
भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३० जागा जिंकल्या. भाजपला १३२ जागा मिळाल्या, तर शिंदेंच्या सेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या.
दरम्यान, अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते या भेटीदरम्यान त्यांच्याशी सरकार स्थापनेबाबत आणि खात्याच्या वाटपाबाबत चर्चा करू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी, X वर पोस्ट करत, माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचे म्हटले आहे. ''महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.''
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…, असे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नमूद केले आहे.
एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्रिपदासाठी आग्रह आहे. अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या काळात गृहमंत्रिपद भाजपला देण्यात आले होते. तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा आग्रह शिंदे गटाने केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडेच गृह खाते ठेवण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत हेच धोरण राहिले, याचा दाखला भाजपकडून देण्यात आला आहे. तसेच शिंदे यांना भाजपने केंद्रात येण्याची ऑफर दिल्याचे समजते. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. त्यांना राज्यातील राजकारणातच राहावे, अशी आमची इच्छा असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज सोमवारी स्पष्ट केले.