

पुढारी ऑनलाईन डेस्क : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्रात त्यांच्या वाढता प्रभावाला गती द्यायची असेल तर त्यांना राज्यातील राजकारणातच राहावे, अशी माझी इच्छा आहे. कारण राज्याच्या राजकारणात त्यांची आवश्यकता आहे, असे शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज सोमवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे त्यांचा निर्णय ते स्वत: घेतील. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. तेआज किंवा उद्या निर्णय घेतील. राज्यात कोणते पद घ्यायचे हा त्यांचा निर्णय आहे, असेही शिरसाट म्हणाले. आमच्या दाढीवाल्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास नक्की करण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला मान्यता दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रविवारी रात्री दिली. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे साताऱ्यातील दरे गावी गेलेले एकनाथ शिंदे ठाण्यात परतले आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, जनतेच्या मनातले सरकार आता स्थापन होईल. शिवसेना सत्तेत सहभागी होणार, असे सांगत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
गृह खाते कोणाकडे? यावरून भाजप- शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आपल्याला उपमुख्यमंत्रिपदासोबत गृह खातेही मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने लावून धरली आहे. अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या काळात गृहमंत्रिपद भाजपला देण्यात आले होते. तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा आग्रह शिंदे गटाने केला आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांकडेच गृह खाते ठेवण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत हेच धोरण राहिले, याचा दाखला भाजपकडून देण्यात आला आहे.