

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात १५ वर्ष काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शरद पवार यांनी नागपुरात एक तरी आयकॉनिक, सांगण्यासारखे काम केले का ?, असा रोखठोक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केवळ मतांसाठीच ते पुन्हा आता एकदा नागपुरात, विदर्भात आले. त्यांनी कधीही काम केले नाही, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
भाजप, महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पश्चिम, उत्तर व मध्य नागपुरात त्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सभा घेतल्या. भाजपने आपल्या मिहान व विदर्भातील उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पूर्व नागपुरातील दूनेश्वर पेठे यांच्या प्रचार सभेत केला होता. त्याला फडणवीस यांनी आता उत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले की, पश्चिम नागपुरातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नगरसेवक म्हणून झाली. महापौर, आमदार आणि आज राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मी स्वतः पश्चिमचा मतदार आहे. 2019 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. आपण कुठे चुकलो याचे आत्मचिंतन करा, पश्चिम नागपूर पुन्हा मिळवायचेच, या विश्वासाने आता कार्यकर्ते मैदानात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून संविधानाच्या आड शहरी माओवाद्यांसोबत देशात अराजक निर्माण केले जात आहे. या आरोपाचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. राहुल गांधी यांचे वास्तव यानिमित्ताने उघडकीस आले असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.