

अमरावती : महायुतीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी रवि राणा यांना बडनेरा मतदारसंघाची जागा दिली. त्यांचे निवडणूक चिन्ह पाना आहे, आम्हालाही काही लोकांचे नट कसायचे आहे. गरज पडली तर तुमचा पाना घेऊ आणि काही लोकांचे नट देखील कसू. विशेषत:आम्हाला या महाविकास आघाडी वाल्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहे, अशा शब्दात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसह इतर विरोधकांवर शुक्रवारी अमरावतीत टीका केली.
पुन्हा आमचं सरकार सत्तेत आलं तर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही घेऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि.८) अमरावती-बडनेरा येथील गोपाल नगर चौकात जाहीर सभा झाली, यावेळी फडणवीस बोलत होते.
यावेळी ग्रामीण भाजप जिल्हा अध्यक्ष खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार रवी राणा बडनेरा, प्रभुदास भिलावेकर, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजप तसेच महायुतीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळेस महाविकास आघाडीच्या लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं. मात्र आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चून ही योजना यशस्वी केली. सर्व प्रकारचे मार्ग बंद झाल्यावर महाविकास विकास आघाडीचे लोकं न्यायालयात गेले. त्यांनी योजनेवर पैशाचा चुराडा होत असल्याचे सांगत योजना बंद करण्याची मागणी केली. मात्र हायकोर्टाने त्यांना नकार दिला.आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहील असेही सांगितले, त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळल्याची टीका देखील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान केली.