सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने माघार घेतली असली तरी अद्याप १८ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीच्या दुसर्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. दि. ४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. माघार घेण्याची अनेक उमेदवारांची मानसिकता नसल्याचे दिसून येत असल्याने या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तीन डमी अर्ज बाद झाले आणि एकाच उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवार अद्याप इच्छुक आहेत. माघार प्रक्रियेच्या दुसर्या दिवशी अर्ज काढून घेण्यासाठी एकही उमेदवार फिरकला नाही. इच्छुक उमेदवारांनी माघार प्रक्रियेकडे सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात अद्याप १८ जण आहेत.
सलग तीन दिवस सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे माघार प्रक्रिया या दरम्यानच्या काळात होणार नाही. सोमवार दि. ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत म्हणजे अर्धाच दिवस माघार घेण्यासाठीचा कालावधी उमेदवारांकडे शिल्लक आहे. आपल्या निवडणुकीतील अडथळे दूर व्हावेत, असे काही उमेदवारांना वाटत असले तरी संख्येने जादा असलेल्या इच्छुकांची मनधरणी करताना त्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत.