इस्लामपूर : शिराळा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडीक यांची बंडखोरी थोपविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपच्या नेत्यांनी सम्राट महाडीक व राहुल महाडीक यांच्याशी चर्चा केली. मात्र उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच घेणार असल्याचे सम्राट महाडीक यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री चार्टर्ड प्लेन पाठवून भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडीक व सांगली जि.म.बॅंकेचे संचालक राहुल महाडीक यांना तात्काळ वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. येथे झालेल्या बैठकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मनधरणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय देऊ, असे सम्राट महाडीक व राहुल महाडीक यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, खा. सुनिल तटकरे, खा. धनंजय महाडीक, भाजपचे नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक यांना शिराळा विधानसभेची उमेदवारी डावलल्यानंतर महाडीक गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने आम्हाला विचारात न घेता उमेदवारी जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सम्राट महाडीक म्हणाले, गेली पाच वर्षे मतदारसंघात प्रचंड काम केले होते. तळागाळात भारतीय जनता पार्टीचा विचार पोहचवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या. त्यामुळे मतदारसंघात अतिशय चांगले वातावरण असताना तिकीट नाकारल्याने आम्ही नाराज आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला विचारात घेऊन निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते.