

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस सत्तेत आल्यास कुटुंबातील एकाच महिलेला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळेल. पण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एकाच घरातील ३ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देते, असे भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हटले आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट केली आहे.
''कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेचा (लाडकी बहीण योजनेसारखी) काँग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देत आहे. म्हणजे सासू, सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमध्ये वाद विवाद आणि स्पर्धा निर्माण करण्याचीच ही काँग्रेसची योजना आहे,'' असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी याआधी केला होता. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांना सक्षम होत असून त्यांना छोट्या- मोठ्या व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करुन दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.