कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
माघारीच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीमागील माहिती आता समोर येऊ लागली आहे. मधुरिमाराजे यांच्या माघारीसाठी राजेश लाटकर यांचे वडील भरत लाटकर यांचा फोन कारणीभूत ठरला. माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी भरत लाटकर यांनी शाहू महाराज यांना फोन करून ‘तुम्ही मला न्याय देणार होता, त्याचे काय झाले?’ असे विचारताच खासदार शाहू महाराज यांनी मधुरिमाराजे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे ठरविले आणि पुढील घडामोडी नाट्यपूर्ण घडल्या. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांचे नाव जाहीर होताच काँग्रेस अतंर्गत संघर्ष उफाळून आला. यातून काँग्रेस कमिटीवर दगडफेकीची घटनाही घडली. त्यानंतर दुसर्या दिवशी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण व शारंगधर देशमुख या इच्छुकांसह 27 नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध करणारे पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांना दिले.
विरोधाची दखल घेऊन सतेज पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे दुखावलेल्या लाटकर यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. स्वत: खा. शाहू महाराज देखील लाटकर यांच्या घरी जाऊन आले होते. त्यांच्या सोबत सुनील मोदी होते.यावेळी भरत लाटकर यांनी, सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका मोठ्या मनाने महाराजच घेऊ शकतात. त्यामुळे यावेळी ते न्याय देतील काय, असा सवाल केला. यावर मी माझ्या सुनेची माघारी घेऊन तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो, असे महाराज त्यांना म्हणाले होते. दरम्यानच्या काळात लाटकर यांना उमेदवारी माघार घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. त्याला राजेश लाटकर आमच्या संपर्कात होते, त्यांनी माघारीसाठी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. पावणेतीन वाजता ते माघार घेणार होते, असे मोदी यांनी सांगितले. यावेळी शाहू महाराज यांना पक्षाच्या चिन्हाबद्दल सांगून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षाच्या चिन्हापेक्षा आपला पुरोगामी विचार महत्त्वाचा आहे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. आपण राजेश लाटकरच्या पाठीशी राहू, अशी भूमिका त्यांनी मांडली, असेही मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी भरत लाटकर यांनी शाहू महाराज यांना फोन केला आणि त्यांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीबद्दल विचारत ‘तुम्ही मला न्याय देणार होता त्याचे काय झाले?’, असा सवाल केला. लाटकर यांचा फोन ठेवला आणि शाहू महाराज यांनी मधुरिमाराजे यांच्या माघारीचा निर्णय घेऊन कोल्हापूरच्या पुरोगामी गादीचा मान राखला.