कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार! शाहू छत्रपती यांची घोषणा

Maharashtra Assembly Polls : काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
Maharashtra Assembly Polls
राजेश लाटकर, काँग्रेस खासदार शाहू छत्रपतीFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Maharashtra Assembly Polls : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले उमेदवार राजू लाटकर यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी सोमवारी अनपेक्षितरीत्या माघार घेतल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर या मतदारसंघात उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत राजू लाटकर यांच्यात थेट लढत होईल.

कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी लाटकर यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला, याला शिवसेनेचे (ठाकरे) नेते विजय देवणे यांनी अनुमोदन दिले. आमदार सतेज पाटील यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल राजू लाटकर यांनी आभार मानले.

काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही, असे स्पष्टीकरण खासदार शाहू छत्रपती यांनी दिले आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

‘काँग्रेस पक्षाची गरज म्हणून उमेदवारी स्वीकारली’

खासदार शाहू छत्रपती यांनी म्हटलंय की, एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला.’

राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार

काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.

Attachment
PDF
Shahu Chhatrapati Press note 05.11.2024 (1)
Preview

‘सतेज पाटील यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी’

सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत,’ असेही शाहू छत्रपती यांनी सष्ट केले आहे.

‘आमच्यात आणि सतेज पाटील यांच्यात मतभेद नाहीत’

‘माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उ‌द्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो.

‘खासदारकीचा राजीनामा देणार, ही अफवा’

‘विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे, असा दिलासा कार्यकत्यांना दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news