

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज रविवारी पक्षाचे संकल्पपत्र अर्थात वचननामा मुंबईत प्रसिद्ध केला. लाडक्या बहिणींना २१०० रूपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, यासह अनेक वचनांची घोषणा करण्यात आली. यापूर्वी महायुतीच्या संयुक्त प्रचारमोहिमेच्या पहिल्याच सभेत दहा आश्वासनांची घोषणा करण्यात आली होती.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील भाजपने जाहीरनामा समिती गठित केली होती. या समितीने विविध घटकांसोबत जाहीरनाम्यासाठी चर्चा झाली. शिवाय, नागरिकांकडूनही सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार आज भाजपने संकल्पपत्र मांडले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या १५०० रूपयांमध्ये वाढ करून २१०० रूपये देण्याचे अश्वासन संकल्पपत्रात देण्यात आले आहे. वृद्ध पेन्शन योजनेचे १५०० रूपयांवरून २१०० रूपये करणार, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भावांतर योजना, राज्यात कौशल्य जनगणना, यासह 'व्हिजन महाराष्ट्र २०२९' प्रसिद्ध करण्याचे अश्वासन संकल्पपत्रात देण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा संकल्प आहे. हमीभावाने मालाची खरेदी केली जाईल, याशिवाय भावांतर योजना राबविण्यात येईल. त्यात हमीभावाशिवाय जो दर कमी असेल त्यातील तफावत सरकार शेतकऱ्यांना देईल, असे अश्वासन त्यांनी दिले.
१० वर्षे युपीए सरकारमध्ये २००४ ते २०१४ पर्यंत तुम्ही मंत्री होता, तुम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केले? असा सवाल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांना केला आहे. एका मुस्लिम संघटनेने अल्पसंख्याकांसाठी आरक्षणाची मागणी केली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे निवेदन मान्य केले. महाराष्ट्रातील जनता काँग्रेसच्या या योजनेशी सहमत आहे का? असा सवाल करत आरक्षण धर्मावर आधारित नसावे, असे शहा म्हणाले.
भाजपचा जाहीरनामा हा महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. एक प्रकारे महाराष्ट्र अनेक युगांपासून प्रत्येक क्षेत्रात देशात अग्रेसर आहे. भक्ती चळवळही महाराष्ट्रातून सुरू झाली, गुलामगिरीतून स्वातंत्र्याची चळवळही शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली, सामाजिक क्रांतीचीही सुरुवात इथूनच झाली असल्याचे सांगत अमित शहा यांना आमचे संकल्प आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे, ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी काही शब्द बोलायला सांगू शकतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणताही नेता दोन वाक्य बोलू शकतो का? विरोधाभासांमध्ये आघाडीचे सरकार स्थापनेचे स्वप्न घेऊन बाहेर पडलेल्या लोकांना महाराष्ट्रातील जनतेने ओळखले तर बरे होईल, असेही अमित शहा म्हणाले.