पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly polls) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. आधी अपक्ष अर्ज भरलेल्या मलिकांना नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अखरेच्या क्षणी 'एबी फॉर्म' दिला. दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, मानखुर्द शिवाजी नगर येथील उमेदवार नवाब मलिक यांच्याबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले, "४ नोव्हेंबरपर्यंत कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल." विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी निवडणूक प्रचारासाठी मालाडला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
याआधी गुरुवारी मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी बोलताना नवाब मलिकांच्या उमेदवारीवरुन विरोधाचा सूर व्यक्त केला होता. "अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तिकीट द्यायला नको होते. महाराष्ट्रातील अनेक लोकांनाही तसेच वाटते. त्यांच्यावर ज्या प्रकारचे गंभीर आरोप आणि आरोपपत्र आहेत; ते पाहाता त्यांना महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. महाराष्ट्र दाऊदसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात आहे. भाजप त्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही.''
दरम्यान, मलिक मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. "भाजप अथवा शिवसेना शिंदे गटाचा आम्हाला विरोध आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. हे अपेक्षित होते. आम्ही दोन्ही विधानसभांत मोठ्या फरकाने विजयी होऊ.” असा विश्वास मलिक यांना व्यक्त केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपचा विरोध डावलत शिवाजी नगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघात नवाब नलिकांना उमेदवारी दिली. तर, त्यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिली. नवाब मलिक यांना आपला विरोध कायम असून भाजप त्यांचा प्रचार करणार नसल्याची स्पष्ट भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांनी जाहीर केली आहे. त्याचवेळी मलिकांच्या कन्या सना मलिक यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार या धोरणानुसार त्यांच्यासाठी काम करण्याची तयारीही भाजपने दाखविली आहे.