सव्वालाख टन खताचा अतिरेक!

सव्वालाख टन खताचा अतिरेक!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

शेणखाताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकर्‍यांचा ओढा रासायनिक खातांकडे वळाला आहे. रासायनिक खतांच्या वापरात गेल्या तीन वर्षांत तिप्पट वाढ झाल्याची माहिती हाती आली. 2021 मध्ये तब्बल 1 लाख 26 हजार 714 टन रासायनिक खतांचा वापर वाढल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. खतांच्या या अतिरेकामुळे जमिनीचा पोत बिघडलाच, शिवाय पिकवलेल्या अन्नधान्यातून मानवी आरोग्यही धोक्यात सापडत असल्याची चिंता सतावते आहे.

रब्बी असो किंवा खरीप, या दोन्ही हंगामात 1965 पूर्वी शेणखतांचा अधिक वापर होत असे. कालांतराने पशुधनाची संख्याही काहीशी घटत गेली. शेणखताऐवजी उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असलेल्या रासायनिक खतांकडे शेतकरी वळले. हरितक्रांती दरम्यान झालेल्या उत्पादन वाढीसाठीही याच रासायनिक खतांचे महत्व अधोरेखीत झाले. तेव्हापासून रासायनिक खतांचा वापर आणि मागणी वाढतच राहिली. रासायनिक खते ही शेणखत, कंपोष्ट खतांना एक पर्याय म्हणून पुढे आलेली आहेत.

बी. टी. तंत्रज्ञान, संकरित वाणांच्या विविध पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनात भर टाकण्यासाठी रासायनिक खते उपयुक्त ठरत आहेत. अर्थात शेतकर्‍यांना शेतीतून उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खतेही फायदेशीर ठरताना दिसत आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना खतांची टंचाई जाणवू नये, यासाठी खतांचा बफर स्टॉक केला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी 5270 मे. टन युरिया आणि 1970 मेटन डीएपी खताचा संरक्षित साठा म्हणून उपलब्ध केलेला आहे.

अन्नधान्य,जमिनीवर दुष्परिणाम

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे, तसेच भूजलाचे प्रदूषण सुरू आहे. वेगवेगळी खते, औषधांचे फवारे यामुळे पिकवलेल्या अन्नधान्यावरही त्याचा परिणाम होऊन थेट मानवी आरोग्यालाही त्याचा फटका बसू लागला आहे.

युरियाचा वापर आणि कृत्रिम टंचाई

युरियात नत्र नायट्रोजन असल्याने ते सर्व पिकांना पोषक आहे. 2019 मध्ये युरियाचा वापर 52 हजार 888 टन होता. तो 2021 मध्ये 78 हजार 343 टन झाला. या तीन वर्षांत युरियाची 25 हजार 425 टन विक्री अधिक झाली.

डीएपीला मागणी; 1150 रु. वाढ

डीएपीत नत्र आणि स्फुरद हे घटक असल्याने शेतकर्‍यांची मागणी जास्त आहे. 2019 मध्ये 2887 टन डीएपीची विक्री झाली होती. त्यानंतर तीन वर्षांत 14 हजार 620 टनांपर्यंत डिएपीचा वापर वाढला आहे. एका गोणीची किंमत 1200 रुपये इतकी होती. मात्र, ती गोणी आता 1350 रुपयांना झाली आहे.

गायी म्हशी घटल्या…!

जिल्ह्यात 2012 ते 2019 या कालावधीत शेळ्या, मेंढ्यांकडे शेतकर्‍यांचा कल दिसला. त्यामुळे गायींची संख्या 48,994 ने घटली, तर शेळी व मेंढ्या 3,25,967 इतक्या वाढल्या आहेत. सध्या जिल्ह्यात गायींची संख्या 13 लाख इतकी आहे. एकीकडे शेणखत कमी होऊ लागले आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेती करणार्‍यांनी आता पुन्हा शेणखताला तीन हजार रुपये ट्रेलर भाव देऊ केला आहे. त्यामुळेही बहुतांश शेतकरी रासायनिक खतांकडे वळले आहेत.

'शाश्वत शेती' कार्यक्रम उपयुक्त ठरणार !
रासायनिक खत वापराचे दुष्परिणाम पुढे येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती ही आरोग्यासाठी गरजेची आहे. त्यासाठी सरकारनेही शाश्वत शेती हा उपक्रम हाती घेतला असून, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याचे सेंद्रिय शेतीत रुपांतर करण्यात येत आहे. यात जैविक खतांबाबतही धोरण ठरविले जात आहे. त्यासाठी अनुदानही दिले जात आहे.

जमिनीचे आणि स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर प्रमाणात करणे गरजेचे आहे. शक्यतो शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी राज्यस्तरावरून शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहनपर योजनाही सुरू केलेल्या आहेत.
-शंकर किरवे,
कृषी अधिकारी, जि.प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news