श्रीरामपूर पालिका कोरोना मृतांबाबत ढिम्म

श्रीरामपूर पालिका कोरोना मृतांबाबत ढिम्म

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर नगरपालिकेला कोरोना मृतांविषयी कोणतेही गांभीर्य नसल्यामुळे दुसर्‍या लाटेच्या वर्षभरानंतरही श्रीरामपूर शहरातील कोरोना मृतांची निश्चित आकडेवारी मिशन वात्सल्य समितीसमोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे कोरोना मृतांचे वारस विविध सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष, पती गमावल्यामुळे अनेक महिलांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अशा कोरोना एकल महिलांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने दि. 27 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार तालुकास्तरावर मिशन वात्सल्य समितीची स्थापना केली आहे. या समित्यांच्या स्थापनेस पुढील ऑगस्ट महिन्यात एक वर्ष पूर्ण होत असतानाही श्रीरामपूरच्या मिशन वात्सल्य समितीसमोर श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत कोरोनामुळे नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला, याची अंतिम अधिकृत सरकारी आकडेवारीच येऊ शकलेली नाही.

त्यामुळे शहरातील एकूण कोरोना एकल महिला व कोरोनामुळे आई अथवा वडील गमावलेल्या बालकांची आकडेवारी देखील स्पष्ट होऊ शकलेली नाही. कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे यांनी डिसेंबर 2021 मध्ये श्रीरामपूर नगरपालिकेस लेखी निवेदन देऊन शहरातील कोरोना मृतांची निश्चित आकडेवारी संकलित होण्यासाठी घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती, परंतु गेल्या सहा महिन्यानंतर देखील श्रीरामपूर शहरामधील कोरोना मृतांची अधिकृत अंतिम सरकारी आकडेवारी समोर येऊ शकलेली नाही.

मिशन वात्सल्य समितीच्या आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक बैठकीत साळवे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे, परंतु त्यानंतरही नगरपालिका कोरोना मृतांची अंतिम आकडेवारी सादर करण्यास अपयशी ठरलेली आहे. मंगळवारी सायंकाळी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वात्सल्य समितीची बैठक झाली.

या बैठकीला नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह समितीचे सदस्य सचिव असलेले बालविकास प्रकल्प अधिकारी हे प्रमुख अधिकारी गैरहजर होते. धस व सामलेटी, बालविकास प्रकल्पाधिकारी यांनी आपले प्रतिनिधी बैठकीस पाठविले होते. मात्र कोरोना एकल महिलांच्या व बालकांच्या पुनर्वसनात महत्त्वाची भूमिका असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधीही बैठकीस आले नव्हते.

यावरूनच पालिकेला कोरोना एकल महिलांचे, कोरोना मृतांचे, त्यांच्या बालकांचे कोणतेही देणे -घेणे नसल्याचे चित्र दिसून आले. नगरपालिकेचे कोणीही अधिकारी बैठकीस हजर नसल्यामुळे एकल समित्यांच्या कामाची माहिती मिळू शकली नाही. तालुका आरोग्याधिकारी डॉ. देशमुख यांनी श्रीरामपूर शहरातील कोरोना मृतांच्या आकडेवारी संकलनाबाबत माहिती दिली.

एकल महिलांना योजनांचा लाभ द्यावा
कोरोना एकल महिलांना प्राधान्याने अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news