शिक्षक बदल्यांचे पोर्टल अखेर सुरू!

शिक्षक बदल्यांचे पोर्टल अखेर सुरू!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या शिक्षक बदलीसाठीच्या पोर्टलचे काल गुरुवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते यशस्वी लाँचिंग झाले. त्यामुळे आता शिक्षक बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन टप्प्यात केल्या जाणार्‍या या बदली प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात आजपासून आठ दिवस शिक्षक प्रोफाईल अद्यावतीकरण केले जाणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील 11 हजार शिक्षक आपले प्रोफाईल अपडेट करणार असून, यातून शासन निर्णयानुसार 10 टक्के प्रमाणे शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत. यावर्षी शिक्षक बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्या ह्या विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 'पोर्टल'व्दारे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शासनाने खासगी कंपनीकडून सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.

मात्र, त्याची चाचणी होत नसल्याने अनेक दिवसांपासून बदली प्रक्रिया लांबताना दिसत होती. अखेर, काल गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक बदलीच्या पोर्टलचे लॉचींग केले आहे. त्यामुळे आता शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी व्हिसीव्दारे सीईओंसह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात शिक्षक माहिती अद्यावतीकरण, दुसर्‍या टप्प्यात आंतरजिल्हा बदल्या आणि तिसर्‍या टप्प्यात जिल्हांतर्गत बदल्या केल्या जाणार आहे.

11 हजार शिक्षकांची माहिती अपलोड
जिल्ह्यातील सर्व 11 हजार शिक्षकांची वैयक्तीक माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाकडे यापूर्वीच पाठविलेली आहे. शासनाच्या बदली करण्यासाठीच्या संबंधित पोर्टलवर ही माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. यामध्ये शिक्षकांचे मोबाईल नंबर, ई मेल आयडी, आधार क्रमांक, पॅन क्रमांक इत्यादी माहितीचा तपशील आहे. ही माहिती आजपासून शिक्षक पाहून ती बरोबर असल्याची खात्री करणार आहेत. त्यानंतरच ती सबमिट केली जाईल.

माहिती चुकल्यास 'ते' शिक्षकच जबाबदार !
शिक्षकांचे इंग्रजीमधील नावाचे स्पेलिंग चेक करावे, शालार्थ प्रणालीत शाळेचा युडाईस नंबर काळजीपूर्वक भरावा, शाळेची प्रोफाईल अपडेट करावी, आज रोजी जे शिक्षक ज्या शाळेत आहेत, त्यांचीच माहिती त्या शाळेच्या शालार्थ प्रणालीत यायला हवी, शिक्षकांचा भ्रमणध्वनी नंबरवर ओटीपी येणार असल्याने तो भरताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. चुकीची माहिती अपलोड झाल्यास त्याची जबाबदारी शिक्षकाची असणार आहे.

शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षकांना आपली माहिती अद्यावतीकरण करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
भास्कर पाटील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news