शिंदे सरकार हाच हिंदूत्वाचा खरा चेहरा : धनंजय देसाई

शिंदे सरकार हाच हिंदूत्वाचा खरा चेहरा : धनंजय देसाई

नगर : पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांताला काळिमा फासून शिवसेनेने मिळविलेली सत्ता, हा हिंदूंच्या मतदानाचा विश्वासघात होता. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष निर्माण होऊन शिवसेनेच्या मूळ हिंदूत्ववादी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. सध्याचे शिंदे सरकार हेच हिंदूत्वाचा खरा चेहरा आहे, अशी प्रतिक्रिया हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी व्यक्त केली. हिंदूराष्ट्र सेनेच्या एकदिवसीय अधिवेशन आणि राष्ट्रनिर्माण संकल्प सभेसाठी देसाई नगरला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुळातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती नव्हती.

हिंदू मतदारांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीला मतदान केले होते. राज्यात हिंदूत्वाचे सरकार स्थापन होण्यासाठी जनादेश मिळाला होता. परंतु, अनैसर्गिक युतीचे सरकार राज्यात गेली अडीच वर्षे काम करीत होते. आता पूर्ण हिंदूत्वाचे सरकार अस्तित्वात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार निश्चितच दिशादर्शक ठरेल. नवाब मलिक जेलमध्ये गेल्यानंतरही मंत्रिपद कायम राहते. अतिरेक्याचे समर्थन करणार्‍या अस्लम शेख यांना मुंबईचे पालकमंत्री पद दिले जाते, कोविड काळातही हिंदूंसाठी सरकार आदेश काढते आणि इतरांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जातात.

हा प्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणाना नक्कीच नव्हता. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचणे, हे नेहमीच समर्थनीयच असेल. पूर्ण हिंदूत्वाचे सरकार केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणे गरजेचे आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये तेच घडले. याच सरकारला बहुमत मिळेल, असा विश्वासही देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आता राजकीय हिंदूत्व हवे!
आता केवळ अध्यात्मिक हिंदूत्व नकोय, तर राजकीय हिंदूत्व हवे. आजही देशात धर्मनिरपेक्षतेचा हिजाब पांघरून जिहादी आणि धर्मांध उन्मादाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हिंदूत्वाला फॅसिझम आणि हिंदूत्वाविरोधात बोलणे किंवा कृती करण्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते. सांस्कृतिक अस्तित्वासाठी फ्रान्ससारख्या प्रगत राष्ट्रानेही कायदे बदलून अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपविले आहे. आपल्यालाही फ्रान्सप्रमाणेच निर्णय घेण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news