कर्जत/जामखेड; पुढारी वृतसेवा: कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये तुरीवर आलेल्या वांझ रोगामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार असून, पीक विमा न भरलेल्या शेतकर्यांना सरकारने मदत करावी. पाऊस नसलेल्या भागातील शेतकर्यांनाही नुकसान भरपाई देऊन पोखरा योजनेंतर्गत विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.
विविध कारणांमुळे शेतकर्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी आमदार पवार यांनी नुकतीच कृषी मंत्री सत्तार यांची मुंबईत भेट घेत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके अवर्षण प्रवण आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तूर, उडीद, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्जत-जामखेड तालुक्यांत तूर पिकांवर वांझ रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान होत आहे. कर्जत तालुक्यात 11 हजार हेक्टर, तर जामखेड तालुक्यात 10 हजार हेक्टरवर तुरीचे उत्पादन घेतले जाते. तुरीवर वांज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावे व पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, पीकविमा न भरलेल्या शेतकर्यांना सरकारी खर्चातून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार पवार यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे केली आहे.
तत्काळ आहवाल सादर करण्याचे आदेश
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार पवार यांच्या मागणीवरून कृषी आयुक्तांना तूर पिकावरील रोगामुळे होत असलेल्या नुकसानीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. तसेच शेतकर्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.