

वळण : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील विविध ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. मानोरी व परिसरातील वाड्या, वस्त्यांवर बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
वळण, मानोरी व परिसरातील गणपत वाडी, खिळे वस्ती, चुलभरे वस्ती आदी वाड्या, वस्त्यांवर गेल्या आठ दिवसांपासून नर, मादी दोन पिल्लांसह असलेल्या बिबट्याने तीन शेळ्या, एक बोकड व दोन-तीन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. दरम्यान, अनेकांना अगदी दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन घडत आहे. दोन शेतकरी हल्ल्यातून बचावले आहेत. (शुक्रवारी) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान सोमनाथ बाळासाहेब थोरात यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवत बिबट्याने शेळी ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेळ्या व गायींच्या आरडा-ओरड्याने थोरात जागे झाल्याने बिबट्याने धूम ठोकली.