नगर : पुढारी वृत्तसेवा : मुलगी जगली वाचली तरच जग तरणार आहे. मुलगी आहे म्हणूनच आपले भविष्य उज्ज्वल होणार आहे, असे प्रतिपादन स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील ४५ नवजात मुली-गोडुल्यांचे स्वागत सन्मान झबलं टोपडं देऊन, तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टिक पदार्थांची पाकिटे व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने 'गोडुली आली घरा-तोच दिवाळी दसरा' या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमधील ४५ नवजात लेकींचा व आईचा अत्यंत भावस्पर्शी स्वागत-सन्मान करण्यात आला. त्या वेळी डॉ. कांकरिया बोलत होत्या.
अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गुरावले अध्यक्षस्थानी होते. डॉ. निर्मला पालेकर, अनघा राऊत, साधना देशमुख, प्रीती सोनवणे, नेहा जाधव, सचीव सुभाष गर्जे, माधव देशमुख, रवींद्र राऊत, हर्षवर्धन सोनवणे, सुहास क्षीरसागर, आदिनाथ ठोंबे, मेटून ज्योती लोंढे तसेच कविता चव्हाण उपस्थित होते. डॉ. कांकरिया या प्रोजेक्टच्या चेअरमन आहेत.
त्या म्हणाल्या की, आज आपण नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करतो, धनासाठी लक्ष्मीची पूजा करतो, ज्ञानासाठी सरस्वतीची भक्ती करतो, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी दुर्गा मातेकडून बळ घेतो. असे असले तरी आजची शोकांकिका आहे की आजची गोडूली गर्भात किंवा समाजात कुठेच सुरक्षित नाही. प्रत्येक घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत झाले. तरच सामाजिक संतुलन निर्माण होणार आहे.
डॉ. पालेकर म्हणाल्या की, नवजात मुलींची प्रतिकारशक्ती मुलांपेक्षा अधिक असते. कितीही मोठे आजारपण आले तरी त्या त्यातून तरून जातात. जन्माआधीच मुलींना मारून टाकणे हे महापाप आहे.
दुसऱ्यांदा नात झालेल्या आजीनेही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, लेकीच जीव लावतात. शेवटपर्यंत त्यांच्याच प्रेमाचा आधार असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. त्यामुळे मला दुसरी नात झाल्याचा विशेष आनंद आहे.