

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्याच्या आवारात हाणामारी करणार्या दोन गटातील तरूणांना पोलिस पथकाने मज्जाव केला असता, पोलिस कर्मचार्यांना धक्काबुक्की करून लोटून देण्यात आले. याप्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा पंधरा ते सोळा लोकांवर दाखल करण्यात आला. यापैकी 11 जणांना गजाआड करण्यात आले तर बाकी पसार झाले आहेत. मागील भांडणाच्या कारणावरून (दि.27) सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गट एकमेकांवर तूटून पडले होते. दरम्यान, दोन्ही गटांत लाथाबुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली.
यावेळी पोलिस पथकाने त्यांना मारहाण करण्यास मज्जाव केला, असता दोन्ही गटातील लोकांकडून कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचार्यांना धक्काबुक्की करून लोटून देण्यात आले. पोलिस पथकाकडून बळाचा वापर करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणणार्या आठ महिला, तीन पुरुष अशा अकरा जणांना गजाआड केले. पोलिस नदिम शेख यांच्या फिर्यादीवरून नारायण भरत माळी, कांताबाई संजय माळी, प्रतिभा गोरख बर्डे, सोनाली करण माळी, आशा गुलाब बर्डे, पूजा विष्णू गोलवड, मयुरी गोरख बर्डे, काजल शंकर बर्डे, अंकुश नामदेव पवार, दत्तू राजू माळी, विमल नामदेव पवार, अजय ऊर्फ बन्नी गोरख बर्डे, राकेश उर्फ जॉकी संजय माळी (सर्व रा. एकलव्य वसाहत राहुरी) यांचा यात समावेश आहे.