राहुरी :राज्यातील बिघाडीचा लाभ भाजप घेणार का?

राहुरी :राज्यातील बिघाडीचा लाभ भाजप घेणार का?
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या वादामुळे महाविकास आघाडी शासन जाते की राहणार, ही प्रश्नार्थक चर्चा झडत असताना राहुरी मतदारसंघातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सहा खात्यांचे राज्यमंत्री पद असलेल्या तनपुरे गटाला डिवचत विरोधी भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये टीका-टिप्पणी सुरू केली आहे.

दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी गट राज्यात आपल्यासाठी काही, तरी चांगले घडेल, या अपेक्षेने राजकीय परिस्थितीकडे बारकावे टिपत लक्ष देऊन आहे. दरम्यान, या परिस्थितीचा लाभ उठवत भाजपने घडत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांची रणनिती आखण्यासाठी बैठकीचा निर्णय घेतला आहे.

विखे-कर्डिले हे दोन्ही गट भाजपच्या सान्निध्यातून एकत्र आहेत. खा. डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते काही दिवसांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी गुप्त बैठका घेत चर्चा करीत होते. राहुरीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असताना दुसरीकडे मात्र भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नव्हता. राष्ट्रवादीची ताकद वाढली असताना राज्यात घडलेल्या मोठ्या घडामोडींचे पडसाद राहुरीत उमटू लागले आहेत.

राहुरी परिसरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडी शासनाच्या बिघाडीने चैतन्य पसरले आहे. आज सोमवारी (26) रोजी भाजपने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये भाजप व विकास मंडळाचे नेते एकत्ररित्या आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचा प्रचार मात्र काहीसा थंडावल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील राजकारणाचा परिणाम पाहता महाविकास आघाडीच्या बंडाने थंड झालेल्या राष्ट्रवादीला बुस्टर डोस देण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे माजी खा. प्रसाद तनपुरे, कृउबा समितीचे सभापती अरुण तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांच्या पाठबळावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात नगरपरिषद, तर ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात नियोजन सुरू केले होते. शहरासह ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीच्या छोट्या-मोठ्या बैठका होत असताना राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता त्याचा मोठा धक्का राहुरीत राष्ट्रवादीला बसल्याचे दिसत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यास राहुरीत भाजपला मोठी ताकद मिळणार असल्याचे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्ष म्हणून आपला वरचष्मा राखण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. भाजपकडून विखे-कर्डिले गटाकडून तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष श्यामराव निमसे, पंचायत समिती सदस्य उदयसिंह पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, तान्हाजी धसाळ, उत्तमराव म्हसे, सुरशिंगराव पवार, पालिकेचे विरोधी पक्षनेते दादा सोनवणे, राजेंद्र उंडे, आर.आर. तनपुरे, विक्रम तांबे, नानासाहेब गागरे यांसह विकास मंडळ व भाजपच्या नेत्यांच्या एकत्र होणार्‍या बैठकीमध्ये सर्वच कार्यकर्ते आज एकवटणार असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजप व विकास मंडळाचे नेते आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, तर विरोधी राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, परंतु आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नियोजन व राजकीय व्यूवहरचनेबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरी नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादीकड,े तर देवळाली प्रवरेची सत्ता भाजपकडे आहे. पंचायत समितीही राष्टवादीकडे आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे दोन, तर विखे गटाचे तीन सदस्य आहेत.

विखे-कर्डिले यांच्या समवेत बैठक कधी..?
विकास मंडळ व भाजप आज एकत्र बैठक घेऊन आगामी निवडणुकांचे नियोजन करणार आहे, परंतु या बैठकीमध्ये खा. डॉ. विखे पा. व माजी मंत्री कर्डिले कार्यक्रमांमुळे बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे खा. डॉ. विखे व कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र बैठक कधी होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सेना-काँग्रेसचे 'वेट अँड वॉच..!
राहुरीमध्ये राष्ट्रवादी व भाजप हे दोन्ही पक्ष महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष देत शिवसेना व काँग्रेस पक्ष 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. दोन्ही पक्षांनी अजून कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही.

वंचित-रिपाइं-शेतकरी संघटना रणांगणात!
राहुरीत सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज असताना वंचित बहुजन आघाडी, रिपाइं (आठवले गट) एमआयएमसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणुकांमध्ये उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राहुरीच्या राजकारणामध्ये यावेळी मोठा ट्विस्ट पहावयास मिळणार आहे. राज्यातील घडामोडी पाहता राहुरीत राष्ट्रवादी व भाजपत चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news