मसाला व्यापाऱ्यास कोयत्याने मारहाण करणारे तिघेही जेरबंद

मसाला व्यापाऱ्यास कोयत्याने मारहाण करणारे तिघेही जेरबंद

राशीन पुढारी वृत्तसेवा :

दोन हजार मागितल्यावर पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने राशीन शहरातील तिघांनी एका मसाला व्यापाऱ्यास दमदाटी-  शिवीगाळ करत डोक्यात, तळहातावर व पायाच्या मांडीवर कोयत्याने मारहाण केली असल्याची घटना राशीन येथे नुकतीच घडली आहे.या व्यापाऱ्यावर भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन असे कृत्य करणाऱ्या तिघांनाही कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेली माहिती अशी,'संदीप प्रल्हाद पानसरे (रा.राशीन ता.कर्जत) वय २४ यांचा मसाल्याचा व्यवसाय आहे. २९ मे रोजी सायंकाळी ८.३० च्या सुमारास फिर्यादी हे शुभम भागवत या आपल्या मित्राच्या कापड दुकानासमोर बसले होते.त्यावेळी तिथे ओळखीचा रोहन मच्छिंद्र माने आला व 'मला दुकान चालवायचे आहे, सांग काय असते? असे प्रश्न विचारू लागला. तेवढ्यात त्याचे दोन मित्र महेश दिपक माने,शाहरुख चाँद शेख हे देखील तेथे आले व त्यातील महेश माने याने फिर्यादीस दोन हजार रुपयांची मागणी केली मात्र फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले.

त्यावेळी तिघांनीही फिर्यादी संदीप पानसरे यांना शिवीगाळ, दमदाटी केली व 'हा आपल्याला पैसे देत नाही, याला आता जिवंत सोडायचे नाही' असे म्हणत महेश माने याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूस दुखापत केली त्यानंतर आणखी डोक्यात कोयत्याने मारहाण करणार तेवढ्यात फिर्यादीने दोन्ही हातांनी कोयता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हाताच्या तळहातावर अंगठ्याजवळ कोयत्याने मोठी दुखापत झाली.

फिर्यादी खाली पडले तेंव्हा आरोपीने पुन्हा डाव्या पायाच्या मांडीवर वार केला.त्यावेळी रोहन माने, शाहरुख शेख यांनी लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केली. यावेळी तिथे शुभम रजपूत,सौरभ थोरात,शुभम भागवत आदींनी सोडवा-सोडव केली मात्र 'आता वाचलास परत भेटला तर जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देऊन तिघेही तेथून निघून गेले. कोयत्याने दुखापत झाल्याने फिर्यादीच्या मित्रांनी फिर्यादिस राशीन येथील डॉ. सुरवसे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे प्रथमोपचार घेऊन फिर्यादीस भिगवण येथील मेडीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले.

दुखापत मोठी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने सध्या फिर्यादिवर तेथेच उपचार सुरू आहेत.संदीप पानसरे यांच्या फिर्यादीवरून दोन हजार रुपये दिले नाहीत म्हणुन कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन महेश दिपक माने,रोहन मच्छिंद्र माने,शाहरुख चाँद शेख (तिघेही रा. राशीन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस हवालदार अण्णासाहेब चव्हाण, तुळशीदास सातपुते, भाऊ काळे, संपत शिंदे, देविदास पळसे, अर्जुन पोकळे आदींनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news