

भाळवणी : पुढारी वृत्तसेवा : भाळवणी येथील विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणार्या भाळवणी, भांडगाव, जामगाव, ढवळपुरी आदी गावांत होत असलेल्या अन्यायकारक 16 तास भारनियमन विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामस्थ व शेतकर्यांनी अभियंता भामरे यांना निवेदन दिले.
सध्या भाळवणी उपकेंद्रातील सर्वच गावातील गावठाण वगळता मळ्यात, वाडी वस्तीवर 16 तासांचे भारनियमन करून संपूर्ण सिंगल फेज विद्युत पुरवठा बंद करण्यात येत आहे. या गावांनी फक्त रात्री 12:55 ते सकाळी 8:55 याच कालावधीत वीजपुरवठा केला जात आहे. त्यात तो अनेकवेळा खंडीत असतो. संबंधित अधिकार्यांना विचारणा केली असता ते वरिष्ठ अधिकारी ठाकूर यांनी तसे तोंडी आदेश दिल्याचे सांगतात.
शेतकर्यांनी जनावरांसाठी चारापाण्याची व्यवस्था रात्री 1 नंतर करायची का? मुलांनी शाळेचा अभ्यास रात्री 1 नंतर उठून करायचा का? असा सवाल दत्तात्रय रोहोकले यांनी केला. वीज बिल भरूनही 8 तासच घरगुती वीज मिळते.हा अन्याय दोन दिवसांत बंद न झाल्यास शेतकरी आपली मुलेबाळे व पशुधनासह भाळवणी उपकेंद्रात घुसून शेतकरी स्टाईलने आंदोलन करतील असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, माजी उपसरपंच शंकर रोहोकले, भांडगावचे सरपंच मच्छिंद्र खरमाळे, गणेश शिंदे, दिनकर सोबले, कैलास शिंदे, आनंदा चौधरी, बाळा शिंदे, मनोज शिंदे आदींनी दिला.
यावेळी रमेश रोहोकले, संदीप भागवत, आप्पा पानमंद, अविनाश राऊत, तान्हाजी रोहोकले, आबा रोहोकले, योगेश शिंदे, मनोज खरमाळे, जालिंदर खरमाळे, गौतम जाधव, प्रशांत जाधव, गोरख खरमाळे, गणेश पारखे, विष्णू पागिरे, गोपीनाथ धुरपते, दिनेश भुजबळ, बाबासाहेब आमले, रामकृष्ण रोहोकले, दीपक रोहोकले, सचिन तुपे आदींसह भाळवणी, भांडगाव, जामगाव, ढवळपुरी आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. नीलेश लंके यांच्याशी फोनवर संपर्क केला असता, ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात होते. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासित केले.