

अकोले, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने भंडारदरा धरण पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी करत असतात. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहून पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रंधा ते भंडारदरा मार्गावर दि.13 ते दि.16 ऑगस्ट दरम्यान एकेरी वाहतूक (वन वे) करण्यात आली आहे.
भंडारदरा धरण, रंधा धबधबा, हिरवीगार वनराई, डोंगर, ढगाळ वातावरणात होणारी रिमझिम अशा वातावरणात हा निसर्गरम्य परिसर सुट्टीमुळे गजबजून जातो. परिसरातील धबधब्यांच्या रौद्र रुपाचे सर्वांनाच आकर्षण असते. काही पर्यटक दारू पिवून धिंगाणा घालत पाण्यात उतरण्याबरोबरच उघडे अंगप्रदर्शन करत दारुच्या बाटल्या हातात घेऊन नाचतात. या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाल्यापासून ते 16 ऑगस्ट रोजी सांयकाळी 7 वाजेपर्यंत भंडारदरा (शेंडी) येथे जाण्यासाठी रंधा फाटा येथून प्रवेश बंद करण्यात आला असून, भंडारदरा (शेंडी) येथे जाण्यासाठी वाकी फाटा व वारंघुशी फाटा येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा, वाकी फाटा, भंडारदरा (शेंडी), साम्रद, रतनवाडी, मुतखेल, गुहिरे मार्ग रंधा बाहेर असा मार्ग असणार आहे.
रस्त्याच्या मध्ये वाहने उभी करून मस्ती करणार्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र फिरते तपासणी पथक नेमण्यात आले आहे. तसेच, वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे व मद्यपान करून वाहन चालविणार्या वाहनचालकांवर या पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. दि.13 ते 16 ऑगस्टच्या पर्यटन महोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त लावून स्वयंसेवक, ग्रामसुरक्षा दल व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. पर्यटकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले आहे.