भंडारदरा धरण 75 टक्के भरले, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा धरण 75 टक्के भरले, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
Published on
Updated on

नगर/ अकोले : पुढारी वृत्तसेवा :  गत आठवडाभरापासून धो-धो बरसणार्‍या पावसाने शनिवारी (दि.15) मात्र उघडीप दिली. रिपरिप पावसाने नगर शहरातील रस्ते चिखलात माखून चिकचिक झाले आहेत. दरम्यान, भंडारदरा व मुळा धरण पाणलोटात पाऊस ओसरल्याने 12 तासात फक्त 176 दशलक्ष घनफूट नवीन पाणी भंडारदर्‍यात आले.

भंडारदरा धरणाचा 8273 दशलक्ष घनफुटावर साठा पोहचला असून, धरण 75 टक्के भरले आहे. पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या मुळा व प्रवरा पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा 5976 (71.76 टक्के) दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. भंडारदर्‍यातून 840 क्यूसेकने तर निळंवडेतून 2300 क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

वाकी धरणातून 556 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. आढळा धरण भरले असल्याने, 725 क्यूसेकने ओव्हर फ्लो सुरू आहे. कोतूळ मुळा नदी 6592 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. नगर शहरासह जिल्ह्यातही पावसाने शनिवारी उघडीप दिली.

नगर शहरातील रस्ते चिखलाने माखले असून, निसरडे झाले आहेत. उपनगरातील रस्त्याने दुचाकी चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून छोटे अपघात होत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने बियाणे, खते खरेदीसाठी शेतकर्‍यांनी कृषीसेवा केंद्रात धाव घेतली आहे. जोराच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने ओल खोलवर गेली. त्यामुळे शेतकर्‍यांना आता वापसा होण्याची प्रतीक्षा आहे.

चोवीस तासांत पडलेला पाऊस
भंडारदरा 92 मिलीमीटर (एकूण 1837 मिलीमीटर). घाटघर 130 मिलीमीटर (एकूण 2550 मिलीमीटर), रतनवाडी 115 मिलीमीटर (एकूण 2666 मिलीमीटर), वाकी 73 मिलीमीटर (एकूण 1437 मिलीमीटर).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news