फेरआरक्षणाने ‘युवराज’ पुन्हा चर्चेत!

फेरआरक्षणाने ‘युवराज’ पुन्हा चर्चेत!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांच्या गटांमध्ये आरक्षण पडल्याने काहींना संधी, तर काही 'युवराजांचे' लाँचिंग लांबण्याच्या मार्गावर दिसले. मात्र, शिंदे सरकारच्या एका निर्णयामुळे गट, गण रचना आणि पडलेले आरक्षणही रद्द होत आहे. त्यामुळे आता नव्याने सोडत होणार असल्याने राजकीय नेत्यांची ही दुसरी पिढी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जिल्हा परिषदेच्या पूर्वीच्या 73 गटांमध्ये मोडतोड करून 12 गटांची त्यात भर पडली.

त्यामुळे 85 गटांसाठी गत आठवड्यात सोडत झाली. अनेक गटांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिलांचे आरक्षण पडल्याने काही नेत्यांच्या दुसर्‍या, तिसर्‍या पिढीच्या लाँचिंगला अडथळा निर्माण झाला होता. काही ठिकाणी संधी झालेली दिसली. आमदार शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख यांची झेडपी निवडणुकीतून राजकीय एन्ट्री होईल, अशी चर्चा होती. त्या दिशेने त्यांची वाटचालही सुरू होती. मात्र, सोनई आणि शनिशिंगणापूर हे गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचा राजकीय श्रीगणेशा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचीही जेऊर, नागरदेवळे गटातून अनेक दिवसांपासून चाचपणी सुरू होती. त्यामुळे झेडपी निवडणुकीत अक्षय कर्डिले हे उमेदवारी करणारच, असे कार्यकर्ते बोलून दाखवत होते. मात्र, आरक्षणात जेऊर आणि नागरदेवळे या गटांमध्ये महिलांचे आरक्षण पडल्याने अक्षय कर्डिले यांना सुरक्षित गट शोधण्याची वेळ आली होती. माजी आमदार नरेंद्र घुले यांचे सुपुत्र डॉ. क्षितिज घुले यांनी पंचायत समिती सभापतीपदापासून राजकीय कारकीर्द सुरू केली आहे.

तेही झेडपीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे ना.मा.प्र.चा दाखला असला, तरी दहिगावने गट त्यांच्यासाठी सोयीचा आहे. अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे सुपुत्र ऋषिकेश यांनी देखील झेडपी लढवावी, असा कार्यकर्तांचा सूर. केदारेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे ते झेडपी लढणार का, कोणत्या गटातून लढणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. काष्टी गटातून स्व. सदाअण्णा पाचपुते यांच्या जागी साजन पाचपुते यांच्या नावाची चर्चा कानावर आली होती.

माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे नातू आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे पुत्र अमित यांचा जिल्हा बँकेतून सहकारात एन्ट्री झाली. झेडपीच्या राजूर गटातून भांगरेंची तिसरी पिढी आखाड्यात चमकणार असल्याची चर्चा होती. विवेक कोल्हे यांचाही सहकारातून जिल्हा बँकेत प्रवेश झालेला आहे. विधानसभेचे दरवाजे उघडविणार्‍या झेडपीबाबत कार्यकर्ते आशावादी आहेत.
वांबोरीचे पाटील घराण्यातील उदयसिंह पाटील यांचाही झेडपीतील प्रवेश दृष्टिक्षेपात दिसू लागला आहे. श्रीरामपुरातून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे सूपुत्र सिद्धार्थ मुरकुटे यांच्या उमेदवारीकडे लक्ष होते. मात्र, टाकळीभान गट सर्वसाधारण महिलेसाठी गेला आहे.

फेरआरक्षणाने पुन्हा संधीची अपेक्षा!
आरक्षण सोडत रद्द झाली, तर नवी सोडत अनुराधा नागवडे, सुवर्णा जगताप, मीराताई शेटे, पंचशीला गिरमकर, सुनीता खेडकर, ताराबाई पंधरकर, प्रतापराव शेळके, कैलास वाकचौरे, उमेश परहर, धनराज गाडे, माधवराव लामखडे, जालिंदर वाकचौरे, राजेश परजणे, सुनील गडाख, राहुल राजळे, शरद झोडगे यांच्यासाठी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन येण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news