पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासन अलर्ट 

Sick woman sitting at home and blowing her nose
Sick woman sitting at home and blowing her nose

नगर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्याच्या दिवसांत साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी झेडपीचे सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिकांचा आढावा घेतला आहे, तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश बजावले आहेत.

पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात. त्यातून जलजन्य, कीटकजन्य आजारांच्या साथी पसरतात. त्यामुळे डेंग्यू, गोवर, हिवताप, गॅस्ट्रो, कावीळ असे रोग उद् भवत असतात. या साथरोगांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जातात. त्यासाठी साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यात नदीकाठची गावे, दुर्गम गावे यांची संख्या लक्षात घेता त्या ठिकाणीही आरोग्य प्रशासन सतर्क असणार आहेत.

जिल्ह्यातील एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, 23 ग्रामीण रुग्णालये, 98 आरोग्य केंद्र, 550 उपकेंद्रे आहेत. या ठिकाणी संबंधित गरजेच्या औषधांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करण्यात आलेली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सर्पदंशाची इंजेक्शन व अन्य औषधांचा साठाही उपलब्ध असणार आहे. गेल्यावर्षी रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या.

मात्र, यावर्षभरात नवीन रुग्णवाहिका दाखल झालेल्या असल्याने तीही चिंता आता दूर झालेली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साथरोग नियंत्रण कक्ष स्थापना केला आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही पावसाळ्यात मुख्यालय सोडू नये, असे आदेश बजाविण्यात आलेले आहेत. सीईओ येरेकर स्वतः याबाबत लक्ष ठेवून आहेत.

आशा सेविकांवर जबाबदारी

गावपातळीवर साथरोग सर्वेक्षणात आशा कार्यकर्त्यांना सहभागी करण्यात आलेले आहे. आशा सेविकांना गावपातळीवर होणारे संशयित साथरोग उद्रेक कसे ओळखावेत, याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात त्यांच्या कार्यकक्षेतील एकाच आजाराचे रुग्ण, गावातील 10 पेक्षा अधिक घरांत किमान एक अतिसाराचा रुग्ण, एक सारख्या तापाचे दोन रुग्ण अशा गोष्टींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये औषधांचा पुरवठा, रुग्णवाहिकांची व्यवस्था, सर्पदंश लस, आरोग्य कर्मचार्‍यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना इत्यादीचा समावेश आहे. तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
                                                                          डॉ. संदीप सांगळे,
                                                             जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news