पारनेरमध्ये रोहित पवारांचे लंकेविरोधकांना बळ

पारनेरमध्ये रोहित पवारांचे लंकेविरोधकांना बळ

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीनिमित्त पारनेरात राजकीय फटाके फुटले. आमदार रोहित पवार यांनी पारनेर तालुक्याचा दौरा करीत शरद पवारांची साथ सोडून गेलेले आमदार नीलेश लंके यांच्या विरोधातील नेते, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. आमदार लंके व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात सख्य वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या दौर्‍याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील आणि नुकतेच नीलेश लंके प्रतिष्ठानमधून बाहेर पडलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना आमदार पवार यांनी पाठबळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधात शरद पवार गट सक्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात सत्ता समीकरण बदलल्यानंतर ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजप पुरस्कृत महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फुत पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. पारनेर तालुक्यात आमदार नीलेश लंके हेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राहिले. तेही अजित पवार गटात गेले. आमदार रोहित पवार यांनी तालुक्यात लक्ष घालत राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते व नवीन फळीतील युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

पारनेरमध्ये माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे आमदार लंके यांच्यापासून बाजूला होवून सवता सुभा उभा केला. अद्यापि कोणताही पक्ष त्यांनी निवडला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासोबत त्यांची जवळीक वाढली. खासदार डॉ. विखे हे पारनेरला आल्यानंतर अनेक वेळा विखे-औटी यांची भेट झाली. विखे यांच्या आशीर्वादाने विजय औटी हे आगामी निवडणुकीत मैदानात उतरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भाऊबीजे निमित्त पारनेर येथे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

खरंतर आमदार रोहित पवार व खासदार डॉ. विखे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. खासदार डॉ. विखे-आमदार लंके यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार पवार-आमदार राम शिंदे असा संघर्ष आहे. आमदार शिंदे यांनी लंके यांची भेट घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच आई मोहटादेवी लंके यांच्या मनोकामना पूर्ण करोत, अशा शुभेच्छा दिल्या. ही चर्चा संपते न संपते तोच आ. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला आमदार लंके आवर्जून उपस्थिती लावली. आमदार शिंदे हेदेखील आमदार लंके यांच्याकडे रात्री उशिरा फराळाला पोहचले.

लंके-शिंदे यांची जवळीकता वाढत असल्याचे चित्र समोर येत असतानाच आ. रोहित पवार यांची पारनेरात एन्ट्री झाली. राम शिंदे हे आ. पवार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्याच आमदारांसोबत आ. लंके यांची मैत्री रोहित पवारांना खटकली असावी.त्यामुळेच त्यांनी पारनेरात येत आ. लंके यांच्या राजकीय विरोधकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून, सध्याचं राजकीय समीकरण पाहता, एका बाजूला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, तर दुसर्‍या बाजूला, ठाकरे सेना , शरद पवार गट, काँग्रेस आहे. त्यामुळे निवडणुकांच्या वेळी नेमकं हे चित्र असच राहील का? असंच राहील तर काय होईल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

लंके विरोधकांची मोट बांधणार?
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार राम शिंदे, तर आमदार नीलेश लंके विरुद्ध खा. सुजय विखे असा राजकीय संघर्ष नगरकर पाहताहेत. आ. शिंदे आणि खा. विखे भाजपचे असूनही त्यांच्यात सख्ख नसल्याचे वारंवार पुढे येते. त्यामुळे आ. पवारांना विरोध करणार्‍या आ. शिंदे यांना लंकेंची साथ पाहायला मिळते. तर आ. लंके हे खा. विखे यांच्या राजकीय निशाण्यावर आहेत. त्यामुळेच तर आ. रोहित पवार- खा. सुजय विखे हे एकत्रितपणे आ. लंके विरोधकांची एकत्रित मोट बांधत नसतील ना, अशी चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news