

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांचे 'पांढरे सोने' समजल्या जाणार्या कापसाला यंदाही 'अच्छे दिन' लाभण्याचे संकेत मिळत आहेत. देशांतर्गत कापूस पिकाचे घटलेले उत्पादन पाहता राहुरीत कापूस उत्पादकांना 10 हजारांपेक्षा अधिक दर लाभल्याने कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राहुरी परिसरात यंदा कपाशीची तब्बल 16 हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी लागवड झाली. उसाचे आगार समजल्या जाणार्या राहुरीत कापसाचा वरचष्मा दिसत आहे. ऊस क्षेत्र 17 हजार हेक्टर असताना त्याबरोबरीत कापसाने उच्चांक मिळविला आहे.
दरम्यान, देशांतर्गत कापूस उत्पादनात झालेली घट, दुसरीकडे चीनचा दुष्काळ तर अमेरिकेतील अतिवृष्टीने दोन्ही मुख्य देशांमध्ये कापसाची टंचाई आहे. त्याचा परिणाम भारतीय कृषी क्षेत्रावर दिसून येत आहे. कापूस पिकाला सीसीआयने कापसाच्या मध्यम धाग्याला 5 हजार 775 रूपये तर लांब धाग्याला 6 हजार 100 रूपये असा हमीभाव जाहीर केला, परंतु सद्यस्थितीला 10 हजारांपेक्षा अधिक दर लाभत आहे. राहुरीतही ठिक-ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. गणरायाचे आगमन होताच शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारपेठेत धाव घेतली आहे.
राहुरी परिसरामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. आषाढ सरींचा सतत वर्षाव तर दुसरीकडे बोंडअळीचा सामना करीत शेतकर्यांनी आपल्या पांढर्याचे सोन्याचे जिवापाड रक्षण केले. त्याचा परिणाम शेतकर्यांना लाभदायी ठरत असल्याचे चित्र आहे. राहुरीत 10 ते 11 हजार रूपये प्रति क्विंटल दर कापसाला लाभत आहे. शेतकर्यांनी शहर व परिसरात 60 ते 65 दुकानांचे काटे आता कापसाच्या प्रतिक्षेत आहेत.
राहुरी तालुक्यात सर्वाधिक ऊस क्षेत्राला प्राधान्य दिले जात होते. बागायतीचा शिक्कामोर्तब असलेल्या राहुरीच्या ऊस क्षेत्रामुळे जिल्ह्यातील डझनभर कारखान्यांची भिस्त अवलंबून आहे. दरम्यान, राहुरीतील शेतकर्यांना मागिल वर्षी कापूस पिकामुळे अधिक लाभ झाला. 9 हजारांपेक्षा अधिक दर लाभल्याने मागील वर्षी कापूस उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड झाली होती. राहुरी परिसरात चांगल्या प्रमाणात झालेला पाऊस तर दुसरीकडे मुळा व भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाहून शेतकर्यांमध्ये उत्साह संचारला होता. यंदाही कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने राहुरीत तब्बल 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे विक्रमी उत्पादन होणार आहे.
बाजार समितीने जिनिंगसाठी प्रयत्न करावे : मोरे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले की, राहुरी परिसरात कापूस उत्पादन वाढले आहे. शेतकर्यांच्या घामाला अधिक दाम मिळावे, यासाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस जिनिंग सुरू केल्यास त्याचा सर्वस्वी लाभ राहुरीच्या शेतकर्यांना होणार आहे. कापूस जिनिंगसाठी बाजार समितीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मोरे म्हणाले.
दिवाळी सण होणार गोड : अतुल तनपुरे
गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही शेतकर्यांच्या पांढर्या सोन्याला 'अच्छे दिन' आले आहेत. यंदाही कापूस उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे. भुलथापांना बळी न पडता शेतकर्यांनी योग्य दर देणार्या व्यावसायिकांनाच आपल्या कापसाची विक्री करावी, असे आवाहन शहरातील कापूस व्यापारी अतुल तनपुरे यांनी केले आहे.