निंबळकला रंगणार ग्रामीण साहित्य संमेलन

निंबळकला रंगणार ग्रामीण साहित्य संमेलन
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समिती इसळक- निंबळक यांच्यातर्फे नगर तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी रविवार दि. 26 जून रोजी निंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरी येथे हे संमेलन पार पडणार आहे. साहित्य रसिकांच्या स्वागताच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. योगेश गेरंगे यांनी दिली.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील समीक्षक, संशोधक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांची निवड झालेली आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी रामदास कोतकर यांच्यावर आहे. संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार असून, यावेळी आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, मसापचे नगर शहर अध्यक्ष किशोर मरकड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

संमेलनात 'सध्याच्या काळात साहित्यिकांची भूमिका' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. महेबूब सय्यद हे असतील. प्रा. डॉ. बाळासाहेब पवार आणि पत्रकार सुधीर लंके हे संवादक उपरोक्त विषयाची मांडणी करणार आहेत. परिसंवादाच्या सत्रानंतर कवी संमेलन होईल.

या सत्राचे अध्यक्षपद कवी संतोष पद्माकर पवार हे भूषविणार आहेत. कवी संमेलनानंतर समारोप सत्राने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी समितीचे उपाध्यक्ष राहुल ठाणगे, सचिव संदीप गेरंगे, मच्छिंद्र म्हस्के, ज्ञानेश्वर गव्हाणे, संतोष घोलप, दिगंबर डहाळे, विनायक कोतकर, राजेंद्र खुंटाळे, सुनील जाजगे, राम बोराटे, सूरज धामी, ज्ञानेश्वर आजबे आदी प्रयत्नशील आहेत.

कवींनी नावनोंदणी करणे आवश्यक
कवी संमेलनात सुसूत्रता आणि नियोजनात्मक बाबींसाठी सहभागी होणार्‍या कवींनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नगर तालुक्यासह इतर भागातील कवींनी अधिकाधिक संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समिती उपाध्यक्ष आणि युवा कवी राहुल ठाणगे यांनी केले आहे. नाव नोंदणीकरिता योगेश गेरंगे आणि राहुल ठाणगे यांच्याशी संपर्क साधावा.

ग्रंथ सन्मान मिरवणूक
सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ सन्मान मिरवणुकीने या संमेलनास सुरुवात होणार आहे. दत्त मंदिर चौक ते श्री क्षेत्र धरमपुरी या मार्गाने ही मिरवणूक जाईल. सकाळी साडेनऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसर्‍या सत्रात 'राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य' या विषयावर सामजिक अभ्यासक आनंद शितोळे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news