

सोनई, पुढारी वृत्तसेवा : येथील महादेव मंदिराजवळील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात बुधवारी रात्री 12:30 वाजता दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी गज कापून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेश तरुण मंडळातील 25 ते 30 सदस्य मंदिराला पोलिसांसह घेराव घालण्याच्या तयारीत असताना चोरट्यांनी तेथून पळ काढला.
गज कापण्याचा आवाज आल्याने मंडळातील कार्यकर्त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून वेगवेगळ्या मार्गाने घेराव घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरटे पळून गेले. या गडबडीतच चोरट्यांची हातोडी, चाकू, रॉड व बुटाचे जोड तेथेच राहिले. रात्री दोन वाजेपर्यंत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, अंधाराचा फायदा घेऊन तेे पळून गेले. दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी अनेक मंदिरे फोडून चोर्या केल्या होत्या. त्यानंतर काही काळ चोर्या थांबल्या होत्या. आता पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे.
सोनईत मोठा गाजावाजा करून लोकवर्गणीतून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली. पण, काही काळानंतर दुरुस्तीच्या नावाने कॅमेरे काढून घेतलेले असून अजूनही कॅमेरे बसविलेले नाहीत. लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.