संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील 68 शेतकर्यांकडून तब्बल 4 लाख 16 हजार रुपयांची पीक विमा हप्त्याची रक्कम घेऊन त्यांना बनावट पावत्या देणार्या आपले सरकार ई महासेवा केंद्राच्या मालकासह चालक या दोघांविरोधात तालुका कृषी अधिकार्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, शहरातील मोमीनपुरा येथील आपले सरकार ई सेवा केंद्राचा मालक प्रसन्न गोरे व चालक प्रवीण ताजणे या दोघांकडे आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सन 2018-19 मध्ये रब्बी हंगामात 62 शेतकर्यांचे 3 लाख 71 हजार 21 रुपये, 2019-20 सालामधील खरीप हंगामातील 6 शेतकर्यांचे 30 हजार 673 असे तब्बल 68 शेतकर्यांचे सन 2018 मधील रब्बी अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी व 2019 मधील खरीप बजाज अलाईन्स कंपनीकडे पिकविमा उतरविला होता. त्यांची रक्कम मिळावी, यासाठी 68 शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकार्याकडे लेखी अर्ज केला होता.
तत्कालीन कृषी अधिकार्यांनी शेतकर्यांचा अर्ज पीक विमा तक्रार निवारण समिता तथा तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो अर्ज जिल्हाधिकार्यांकडे पाठविला. त्यानंतर चौकशी अंती सुविधा केंद्र चालविणार्या प्रवीण सुधाकर ताजणे व प्रसन्न गोरे या दोघांनी शेतकर्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या दोघांविरोधात फौजदारी करावाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर तत्कालीन कृषी अधिकार्यांनी अवलोकन करून तालुक्यातील 68 शेतकर्यांना 4 लाख 16 हजार रुपयांच्या बनावट पावत्या दिल्याचे उघड केले. शेतकर्यांनी भरलेली पीक विम्याची रक्कम शासनाकडे अथवा संबंधित विमा कंपन्यांकडे जमा न करता स्वत:च्या फायद्याकरिता वापरल्याचे अधिकार्यांच्या निष्कर्षातून निष्पन्न झाले होते.
दरम्यान, याप्रकरणी संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आपले सरकार ई सेवा केंद्र मालक प्रसन्न गोरे व चालक प्रवीण ताजणे या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आता या दोघांना पकडल्यानंतर फसवणूक झालेल्या शेतकर्यांना त्यांची कष्टाची रक्कम परत मिळेल की नाही, हे उघड होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सन 2018-19 मध्ये रब्बी हंगामात 62 शेतकर्यांचे 3 लाख 71 हजार 21 रुपये, 2019-20 सालामधील खरीप हंगामातील 6 शेतकर्यांचे 30 हजार 673 असे तब्बल 68 शेतकर्यांची विमा हप्त्याची रक्कम नियमानुसार जमा न करता परस्पर हडप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.