नगर : ‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांना दुर्गम भागात केंद्र
राहुरी, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागामार्फत सीईटी परीक्षेसाठी अकोल्यासारख्या दुर्गम भागात नगर जिल्ह्यातील परीक्षार्थींना परीक्षा केंद्र दिल्याने नगर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे.
अकोल्यासारखा भाग व परीक्षेची वेळ अत्यंत गैरसोयीची असल्याने यात शिक्षण विभागाने तत्काळ लक्ष घालण्याची मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यापैकी बारावीनंतर पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) काही अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र, ही परीक्षा देण्यासाठी राहुरी, श्रीरामपूरसह जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना अकोले येथील परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. शिवाय परीक्षेची वेळ सकाळी नऊ आणि दुपारच्या सत्रातील पाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आल्याने हे विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत गैरसोयीचे ठरणार आहे.
अकोले येथील अंतर या भागातून 80 ते 100 किलोमीटर इतके दूर आहे. अशा परिस्थितीत पालक आणि परीक्षार्थी यांचा वेळ होणारी दगदग आणि आर्थिक आणि कोणताही विचार या शिक्षण विभागाने केलेला दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन तालुक्यातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राहुरी येथील पालक प्रदीप साहेबराव निमसे यांनी केली आहे.

