नगर : साथींचा आरोग्याला ताप!

नगर : साथींचा आरोग्याला ताप!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होताच विषाणूजन्य आजारांच्या साथींचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखीबरोबरच 'व्हायरल ताप' चढल्याने ग्रामीण रुग्णालये, खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचे थैमान सुरू होते. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीपासून कावीळ, टायफायड, गॅस्ट्रोपर्यंत आजार निदर्शनास येतात. तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये अतिसार, उलट्यांचेही प्रमाण दिसते. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात मान्सूनपूर्व तयारी केली आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत, औषधे उपलब्ध केलेली आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेल्या औषधांची किट तयार ठेवण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाकडून डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना पायबंद घालण्यासाठी जनतेत प्रबोधन केले जात आहे. पाण्याचे डबके ठेवू नये, पाणी वाहते करावे, अशा सूचना केल्या जात आहेत.

केंद्रांत रुग्णसंख्या वाढली

ग्रामीण रुग्णालयात सरासरी दररोज 50 रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर आता ही ओपीडी 70 पर्यंत पोहचली असून, येणार्‍या काळात ती 100 पर्यंत जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. सध्या 98 ग्रामीण रुग्णालयात दररोज 10 हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

खासगीत आर्थिक लूटमार; नियंत्रण कोणाचे?

एकीकडे शासकीय रुग्णालयात सर्व सुविधा असल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र येथे रुग्णांना अपेक्षित सेवा मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने अनेक रुग्णांना खासगीत उपचार घ्यावे लागतात. रुग्णांचे अनावश्यक तपासण्या, महागडी औषधे आदींच्या नावाखाली आर्थिक शोषण केले जाते.विशेष म्हणजे या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

व्हायरल तापाची लक्षणेस : घसा दुखणे, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी, उलट्या आणि अतिसार सुरू होणे, याशिवाय डोळे लाल होऊन डोके गरम होणे.

हिवतापाची लक्षणे : थंडी वाजून ताप येणे, ताप कमी होताना भरपूर घाम येणे, ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येणे, तसेच तापाबरोबरच डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी व थकवा जाणवणे

डेंग्यू लक्षणे : एकाएकी तीव्र ताप येणे, डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे.

अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी 1 ते 15 जूलै कालावधीत 'विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा' राबविण्यात येत आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील 4 लाख 47 हजार 103 बालकांना 'ओआरएस' चे पाकिटे दिली जाणार आहेत. माता व पालकांचेही स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

                                                        – डॉ.संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

पावसाळ्यात शक्यतो साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरीकांनीही पाणी उकळून प्यावे, घराभोवती पावसाच्या पाण्याचे डबके साचू देेऊ नये, पाणी वाहते ठेवा, परिसरा स्वच्छ ठेवा. आवश्यक काळजी घ्या.

                                                                         – डॉ. मोहन शिंदे, जिल्हा परिषद

रुग्णालयांची संख्या

  • आरोग्य केंद्र -98
  • उपकेंद्र -555
  • ग्रामीण रुग्णालये -24
  • उपजिल्हा रुग्णालये -2
  • आयुर्वेदिक रुग्णालये -2
  • जिल्हा रुग्णालय -1

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news