

नगर, गोरक्षनाथ शेजूळ : राज्यातील बहुचर्चित 2018-19 च्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील तपास कागदावरच असतानाच 2021 चा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. 2021 मधील टीईटीचे नगर जिल्ह्यातील 10 हजार परीक्षार्थीं निकालाकडे सात महिन्यांपासून डोळे लावून बसले आहेत. पडताळणीसाठी गेलेल्या नगरमधील 'त्या' 86 शिक्षकांचे प्रमाणपत्र खरे की खोेटे? याविषयीचा अहवालही गुलदस्त्यातच आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडाचा घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली 'टीईटी'ही चर्चेत आली.
21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा झाली होती. प्राथमिक शिक्षण स्तरावर 10 हजार 410 भावी शिक्षकांनी ही परीक्षा दिली होती. मराठी 9728, इंग्रजी 406, उर्दू 216, हिंदी 55, कन्नड 01, तेलगू 02 अशा नगर जिल्ह्यातील परीक्षार्थींचा त्यात समावेश होता. मात्र, 2018-19 मधील घोटाळ्याचा तपास सुरू असल्याने 2021 चे निकाल अद्यापही लागलेला नाही.
शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना ताब्यात घेतल्यानंतर 2018 चा टीईटी घोटाळाही समोर आला. त्याचे धागेदोरे तत्कालिन संचालक सुखदेव डेरे यांच्यापर्यंत पोहचले. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील त्यांच्या 'सुखमय' या निवासस्थानी पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. डेरे यांच्याबरोबर सुपे यांचेही नगर कनेक्शन त्यावेळी चर्चेत आले. सुपे हे 1993 ते 1996 या कालावधीत संगमनेरच्या अध्यापक महाविद्यालयात (डीएड कॉलेज) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सुपे-डेरे यांचे नगर हे केंद्रबिंदू ठरले.
टीईटी परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातील 10 हजार 400 परीक्षार्थींनी 500 तर मागासवर्गीयासाठी 250 रुपये फी भरून प्रवेशपत्र मिळविल्याचे समजते. यात जिल्ह्यातून सुमारे 40 लाखांच्या आसपास फी म्हणून रक्कम परीक्षा परिषदेच्या तिजोरीत जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अगोदरच शिक्षक भरती रखडल्या आहेत. त्यात भरती निघालीच तर टीईटीचा अद्याप निकाल लागलेला नाही, त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भिती परिक्षार्थी व्यक्त करतात.
2018-19 मधील टीईटी घोटाळ्यात आतापर्यंत 40 पेक्षा अधिकांची चौकशी झाली आहे. याशिवाय 2013 नंतर टीईटी पास होऊन शिक्षक झालेल्या शिक्षकांची मूळ निकाल आणि टीईटी प्रमाणपत्र पडताळणी हाती घेण्यात आली. नगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील आठ, माध्यमिकचे 49 आणि खासगी शाळांमधील 29 शिक्षकांचे 31 असे 88 प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले. त्याचा तपास अद्याप गुलदस्त्यात आहेत.
राज्यातून 2019 च्या टीईटी उत्तीर्ण परीक्षार्थींचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परीक्षा परिषदेकडून सायबर पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. पडताळणी सुरूच असल्याने अद्यापही त्याचा अहवाल तयार झालेला नाही. निकालाबाबत लवकरच काय तो निर्णय होईल.
– शदर गोसावी, परीक्षा परिषद, पुणे
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 88 प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापूर्वीच परीक्षा परिषदेकडे पाठविलेली आहेत. त्याचा तपास सुरू आहे. 2021 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाला अद्याप लागलेला नाही, तो कधी लागेल, याबाबत अद्याप तरी काही सूचना नाहीत.
– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक