

शेवगाव, रमेश चौधरी : तालुक्यातील रस्ते निराधार झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आकार वारेमाप रुंदावत चालल्याने प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असून, त्यांचे आयुर्मान कमी होत चालले आहे. विकासासाठी वार्यावर सुटलेला हा तालुका सध्या वाल्मिकीच्या शोधात आहे. अनेक रस्ते खड्ड्यांत हरवले असताना, सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मणी झाले आहेत.
दुरुस्तीअभावी अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी तरी मजबूत रस्ते होतील, ही अपेक्षा प्रत्येक वर्षी फोल ठरत चालल्याने जनतेच्या संतापाने परिसीमा गाठली आहे. शेवगाव-नेवासा, शेवगाव-तिसगाव, शेवगाव-मिरी, शेवगाव-पैठण, शेवगाव-गेवराई हे सर्वच राज्यमार्ग खडतर झाले आहेत. खेडोपाडी जोडलेल्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. एवढेच नव्हे, तर अवघ्या काही महिन्यात पुलांची, डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची झालेली दुरवस्था, कामाच्या दर्जाबाबत बरेच काही सांगणारी ठरत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना बळी गेला आहे, अनेकांना अपंगत्व आले आहे, तर अनेकांना हाडांच्या व्याधी निर्माण झाल्या आहेत. अशा खडतर रस्त्याचा प्रवास सर्वांनाच असह्य झाला आहे. एकेकाळी रस्त्याच्या बाबतीत शेजारील मराठवाडा मागास समजला जात होता. आता मराठवाडा शेवगावास मागास समजत आहे. या बदलास कोण कारणीभूत असावे, याचे आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे नेवासा-शेवगाव- गेवराई 99 कि.मी., पांढरीपूल-मिरी-शेवगाव 24 कि.मी., तिसगाव-शेवगाव- पैठण 29 कि.मी., या प्रमुख राज्यमार्गात, तसेच 292 कि.मी. असणारे जिल्हा मार्ग यातून प्रवास करताना अपवाद वगळता कुठचा खड्डा चुकवावा हेच समजत नाही. त्यामुळे प्रत्येक खड्ड्यात जाणारे चाक दोन लाखोलीचे शब्द काढणारे ठरत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अखत्यारित असलेले 245 कि.मी.चे 23 इतर जिल्हा मार्ग व 611 कि.मी.चे 217 ग्रामीण मार्गापैकी कुठेतरी अर्धा सुखाचा प्रवास होतो.
शेवगाव-पैठण राज्यमार्गाच्या 9 किलोमीटर कामासाठी मार्चमध्ये जवळपास 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पावसाळ्यानंतर या कामास सुरवात होणार आहे. इतर राज्यमार्गांच्या कामासाठी आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात मागणी केली आहे. त्यामध्ये ही कामे मंजूर होण्याची अपेक्षा आहे. हे सर्व राज्यमार्ग केंद्राकडे हस्तांतरित होणार होते. त्यामुळे निधी मिळाला नसल्याचे उपविभागीय अधिकारी प्रल्हाद पाठक यांनी सांगितले.
शहरातील वर्दळ पाहता बाह्यवळण रस्त्याची मागणी होती. छगन भुजबळ बांधकाम मंत्री असताना त्यांनी या बाह्यवळण रस्त्यास मंजुरी देऊन त्यासाठी काही निधी दिला होता. त्यानंतर या बाह्यवळण रस्त्याचा सर्व्हे झाला. मात्र, नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. पुन्हा युती शासनाच्या काळात याचा फेरसर्व्हे झाला. मात्र, भूसंपादनासाठी 100 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने, त्या बाबत निर्णय झाला नसल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांनी सांगितले.
राज्यमार्गांची दुर्दशा पाहता, त्यांच्या कामास लवकर मंजुरी मिळावी, यासाठी सोमवारी (दि.8) रोजी नव्याने रुजू झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन वंडगवाळ यांनी अधिकार्यांसमवेत या मार्गांची पाहणी केली आहे. मात्र, यासाठी लोकांनीही एकत्रितपणे आवाज उठविण्याची गरज निर्माण झालेली आहे.