नगर : शिक्षकांबद्दल अवमानकारक वक्तव्यामुळे आमदार बंब यांचा निषेध

नगर :  शिक्षकांबद्दल अवमानकारक वक्तव्यामुळे आमदार बंब यांचा निषेध
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांच्या संबंधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून विधिमंडळात शिक्षकांचा अवमान करणार्‍या आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा नगर प्राथमिक शिक्षक समितीने निषेध केला आहे. शिक्षक मुख्यालयी राहात नाहीत, म्हणून शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, असे वक्तव्य करतानाच अर्थहीन आणि अतार्किक मुद्दे मांडून आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा अवमान केला आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी निवासस्थाने नसताना मुख्यालयी राहण्याचा आग्रह योग्य नाही. विशेष म्हणजे अनेक शाळांच्या इमारतींची दुरवस्था लोकप्रतिनिधी नजरेआड करत आहेत.

शिक्षक मुख्यालय राहत नाहीत, म्हणून शैक्षणिक गुणवत्ता घसरली आहे, असे वक्तव्य एकांगी आणि वास्तवात दुर्लक्ष करणारे आहे. राज्यात सध्या शिक्षकांची 20 हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. अशैक्षणिक कामांचा ससेमिरा, अजूनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके नाहीत, हजारो शिक्षण सेवक केवळ सहा हजारांवर वेठबिगारीसारखे राबत आहेत. प्रभावी आणि परिणामकारक अध्ययन-अध्यापनासाठी शाळांमध्ये आवश्यक साधनसामग्रीबाबत नाही.

अनेक शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक, लिपिक, स्वच्छता कामगार, परिचर आणि शिपाईदेखील नाही. कार्यालयीन कामे, मतदार नोंदणी, सर्वेक्षणे, लसीकरण, आधार कार्ड मतदार कार्डशी संलग्न करणे, विद्यार्थ्यांचे बँकेत खाते काढणे, पोषण आहार योजना राबविणे, रोजचे रेकॉर्ड ठेवणे ही अशैक्षणिक कामे शिक्षकांनाच करावी लागतात. शिक्षकांना दोष देणे सोपे आहे. मात्र, त्यांच्या अडचणी समजून घेऊन सकारात्मक विचार लोकप्रतिनिधींनी करावा. शिक्षकांची बदनामी करण्याचा प्रयत्न शोभनीय नाही. प्राथमिक शिक्षक समिती आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेध करीत असून, त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी संजय कळमकर, रा. या. औटी, अनिल आंधळे, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, सुनीता काटकर, अशोक कानडे, माणिक जगताप, शशिकांत आव्हाड, सुनील बनोटे, भाऊ जठार, मिलिंद पोटे, दादाभाऊ नवले यांनी केली आहे.

गुरुजींनी ज्ञान दिले म्हणून अनेकांना मान मिळाला. पुन्हा त्याच गुरुजींचा अपमान करणारी वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करतात. उलट शिक्षकांना पेन्शन नाही, म्हणून आम्हीही पेन्शन घेणार नाही, अशी घोषणा लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे.
                                                           – डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news