नगर : शिक्षक बँकेसाठी काटे की टक्कर!

नगर : शिक्षक बँकेसाठी काटे की टक्कर!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँक निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. यावेळी जागावाटपात अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले. त्यामुळे अर्ज माघारीवेळी काहींनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतपेटीतून 'ताकद' दाखवून देण्याची भीष्मप्रतिज्ञा केल्याचेही पाहायला मिळाले. काही तालुक्यात अर्ज शिल्लक राहिल्याने त्याठिकाणी बंडखोरीचे चित्र उभे राहिले आहे.

शिक्षक बँकेसाठी 799 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अनेकांना शब्द दिलेला असल्याने त्यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र, काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रमुख मंडळांनी कुठे आयात केलेल्या उमेदवाराला तर कुठे 'सोधा' डोळ्यांसमोर ठेवून उमेदवार्‍या वाटल्या. त्यामुळे निष्ठावंत दुखावल्याचे पाहायला मिळाले. अर्ज माघारी प्रक्रियेवेळीही काहींना डावलल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसले. तर, काहींनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आम्ही इतके काम करुनही डावलल्याची खंत व्यक्त केली. सायंकाळी उशिरापर्यंत उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात देविदास घोडेचोर अर्ज माघारीची प्रक्रिया राबविताना दिसले.

तांबे गटात ऐक्य, शिक्षक भारती आणि एकल!

सत्ताधारी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी शिक्षक भारती, ऐक्य आणि एकल या छोट्या मंडळांना सोबत घेवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शिक्षक भारतीला विकास मंडळाची एक जागा आणि बँकेत स्वीकृत संचालक म्हणून संधी देण्याचा शब्द दिला. तर, ऐक्य मंडळाला बँकेसाठी एक जागा देण्यात आली.

गुरुजींची 'गुरुमाऊली' स्वबळावर!

रोहोकले गुरुजीप्रणित गुरुमाऊली मंडळानेही या निवडणुकीत छोट्या-मोठ्या संघटनांना सोबत घेण्यासाठी बैठका घेतल्या. मात्र, शेवटपर्यंत जागा वाटपाचे गणित न जुळल्याने त्यांनी स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुरुजींनी अनेकांना शब्द दिले असताना प्रत्यक्षात उमेदवारी 'बाहेर'च्या इच्छुकांना दिल्याने मोठी खदखद पहायला मिळाली.

'स्वराज्य' कळमकरांसोबत

गुरुकुल मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर आणि सदिच्छाचे राजेंद्र शिंदे यांच्यात निवडणूक लागण्यापूर्वीपासून आघाडीच्या आणाभाका सुरू होत्या. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यात जागा वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे डॉ. कळमकर यांनी सदिच्छाला बाजूला ठेवून ऐनवेळी स्वराज्यला बँकेच्या तीन जागा व विकास मंडळाच्या चार जागा देऊन खेळी केली.

'चाणक्य'चीच राजकीय गेम

बँकेच्या राजकारणात चाणक्य संबोधल्या जाणार्‍या राजेंद्र शिंदेंची या निवडणुकीत काहींनी ठरवून राजकीय कोंडी केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सोबत घेण्याचा 'काहींनी' शब्द दिला होता. मात्र, काही तास शिल्लक राहिले असतानाच 'तुम्ही तुमचा निर्णय घ्या' असा निरोप त्यांना मिळाला. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी सदिच्छासोबत इब्टा आणि शिक्षक संघाला सोबत घेऊन चौथा पर्याय उभा केला.

तीन लाख आणि चर्चांना उधाण

एका मंडळाने आठ दिवसांपूर्वी प्रवेश दिलेल्या इच्छुकाला उमेदवारी दिल्याने निष्ठावंत भलतेच दुखावले गेले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश केला आणि 11 तारखेला थेट उमेदवारी दिली. या आठ दिवसांत संबंधिताने असे नेमके कोणते काम केले, याचे उत्तर निष्ठावंत शोधत आहेत. यातून या उमेदवारीसाठी तीन लाख मोजल्याचीही चर्चा पुढे येत आहे.

गुरुमाऊलीने शिक्षक भारती, ऐक्य, एकल अशा समविचारी मंडळांना सोबत घेतले आहे. उमेदवारी वाटपात निष्ठावंतांना आणि सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात सभासदहित डोळ्यांसमोर ठेवून गुरुमाऊलीची घोडदोड सुरूच राहील.

                                                               – बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळ

प्रथमपासूनच स्वबळावर लढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार रोहोकले गुरुजींच्या आदेशानुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आमचा सभासदांवर विश्वास असून, गुरुजींच्या स्वच्छ कारभारावर निवडणुकीला सामोरे जाऊ.

                                                                          – प्रवीण ठुबे, रोहोकले प्रणित

बँकेच्या निवडणुकीसाठी स्वराज्य मंडळाला सोबत घेतले आहे. तसेच सर्वसाधारण जागांसह एकूण पाच जागांवर महिलांना उमेदवारी देवून नारी शक्तीचा सन्मान केला आहे. आमच्या कोणीही नाराज नाही. पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

                                                                     – डॉ. संजय कळमकर, गुरुकुल

गुरुकुलने यापूर्वीही इब्टाला आता सदिच्छाला फसविले. असो तरीही प्रस्थापितांविरोधात सदिच्छासोबत बहुजन संघ (इब्टा), आबासाहेब जगताप ( शिक्षक संघ) आणि साजिरे अशी चौथी आघाडी सज्ज आहे. नक्कीच आम्हाला यश मिळेल.

        – राजेंद्र शिंदे, सदिच्छा मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news