

नगर, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर शहर विकासासाठी सुमारे 12 कोटींची कामे मंजूर झाली होती. मात्र, शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर शहरातील या कामांना स्थागिती मिळाल्याने विकासाला खोडा बसला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करून नगरविकास खात्याकडून रस्ते विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी आणला होता. या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक-चाणक्य चौक ते बुरूडगाव रस्ता, सारसनगरमधील विविध ठिकाणी चार रस्ते, त्यात सारसनगर-कोंबडीवाला मळा सोलापूर रोड अशा महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. या कामाला शिंदे-फडणवीस सरकारने पुढील आदेश येईपर्यंत तूर्त स्थगिती दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरविकासासाठी महाविकास आघाडी सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून 2 कोटी रुपयांचा निधी आणला होता. त्यात सावेडी, केडगावसह शहराच्या विविध भागांतील रस्ते, सीसीटीव्ही, वॉल कंपाऊंड, पेव्हिंग ब्लॉक टाकणे, मंदिरांची कामे मंजूर करण्यात आली होती. मुकुंदनगरसाठी 76 लाखांच्या विशेष कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी सुमारे दोनशे बाकड्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्या निधीला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे.
नगर शहरातील रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात नव्याने सरकारने कामांना स्थगिती दिली आहे. नगर शहरासाठी आलोेला निधी कोणत्या एका पक्षाचा नसून, शहर विकासासाठी आलेला आहे. त्यासाठी पुन्हा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल.
– संग्राम जगताप, आमदार नगर शहर
तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आणि शहर काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे 2 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र, नव्या सरकारने त्या कामांना स्थगिती दिल्याने काँग्रेस त्यांचा निषेध करीत आहे.
– किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस